उत्तराखंडमधील बोगद्यात अडकलेल्या ४१ कामगारांना वाचवण्यासाठी रॅट होलच्या अखेरच्या टप्प्यात एका खोदकाम पथकाने महत्त्वाची भूमिका बजावली. या पथकात हिंदू-मुस्लीम अशा दोन्ही धर्माच्या कामगारांचा समावेश असल्याचं समोर आलं. यानंतर हे पथक भारताचं धार्मिक वैविध्य आणि त्यातील एकात्मतेची भावना दाखवणारं असल्याची भावना व्यक्त केली जात आहे. या पथकाचे प्रमुख वकील हसन यांनी इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या प्रतिक्रियेत बचाव मोहिमेचं हे यश सर्वांचं असल्याचं सांगितलं. तसेच कुणा एकाला हे काम करणं शक्य झालं नसतं, असं नमूद केलं.

वकील हसन म्हणाले, “आमच्या पथकात हिंदू आणि मुस्लीम दोन्ही धर्माचे लोक होते. दोन्ही धर्माच्या लोकांनी बोगद्यात अडकलेल्या ४१ कामगारांना वाचवण्यासाठी कठोर मेहनत केली. यापैकी कुणीही एकजण हे काम करू शकला नसता. मी प्रत्येकाला हाच संदेश देऊ इच्छितो. आपण सर्वांनी एकमेकांबरोबर प्रेमाने राहिले पाहिजे. द्वेष पसरवायला नको. आपल्या सर्वांना आपले १०० टक्के देशासाठी द्यायचे आहेत. कृपया माझा हा संदेश प्रत्येकापर्यंत पोहचवा.”

या पथकात एकूण १२ लोक होते. ६ जण दिल्लीतील आणि ६ उत्तर प्रदेशमधील बुलंदशहरचे होते. जेव्हा बोगद्यात अडकलेल्या कामगारांना बाहेर काढण्यासाठी ड्रिल मशीननेही काम होईना, तेव्हा या कामगारांना खोदकामासाठी बोलवण्यात आलं. सोमवार आणि मंगळवार या दोन दिवसात त्यांनी १२ मीटर खोदकाम केलं.

रॅट होल खोदकामात सहभागी पथकात कुणाचा समावेश?

१. हसन
२. मुन्ना कुरेशी
३. नसीम मलिक
४. मोनू कुमार
५. सौरभ
६. जतीन कुमार
७. अंकुर
८. नसीर खान
९. देवेंद्र
१०. फिरोज कुरेशी
११. रशीद अन्सारी
१२. इर्शाद अन्सारी

हेही वाचा : ‘त्यांनी आम्हाला खांद्यावर उचलले’बचाव पथकाच्या कर्मचाऱ्यांचे अनुभवकथन

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हे सर्व कामगार २० ते ४५ वयोगटातील आहेत. हे सर्व कामगार ‘रॅट होल’ घेण्यात तरबेज आहेत. त्यांना दिल्ली जल बोर्डातील कामाचाही अनुभव आहे. या कामात ४१ लोकांचे प्राण वाचवण्याचा हेतू होता. हाच आमच्यासाठी प्रेरणा देणारा भाग होता. इतकंच नाही, तर देशातील १४० कोटी जनतेसह जगाची नजर या बचाव मोहिमेवर होती, अशी भावना या कामगारांनी व्यक्त केली.