मेजर नितीन लितूल गोगोई प्रकरणानंतर ‘हिज्बुल मुजाहिद्दीन’ या दहशतवादी संघटनेने काश्मिरी मुलींना भारतीय सैन्यातील जवान आणि अधिकाऱ्यांपासून दूर राहा, अशी धमकी दिली आहे. भारतीय सैन्याकडून काश्मिरी मुलींचा हनीट्रॅप म्हणून वापर केला जाऊ शकतो. त्यामुळे सैनिकांपासून लांब राबावे, असे मुजाहिद्दीनने म्हटले आहे.
हिज्बुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेचा कमांडर रियाझ नायकू याने ऑडिओ क्लिप जाहीर केली आहे. या क्लिपमध्ये तो म्हणतो, भारतीय सैन्याने काश्मिरी मुलींचा हेर म्हणून वापर केल्यानंतर आता त्यांचा हनीट्रॅपसाठी वापर सुरु केला आहे. मुजाहिद्दीनविरोधात भारतीय सैन्याने ही खेळली खेळली असून भारतीय सैन्याकडून मुलींना ब्लॅकमेल करुन त्यांना हिज्बुलविरोधात वापरले जात आहे, असा दावा त्याने केला आहे. त्याची ऑडिओ क्लिप काश्मीरमध्ये व्हायरल झाली आहे.
भारतीय सैन्याकडून सद्भावना मोहीमेच्या नावाखाली शालेय विद्यार्थ्यांसाठी दौरे आयोजित केले जातात. पण याच दौऱ्यात मुलींना जाळ्यात ओढले जाते. पालकांनी अशा दौऱ्यांमध्ये मुलींना पाठवू नये आणि जे शिक्षक विद्यार्थ्यांना घेऊन या दौऱ्यात जातील त्यांना याचे विपरित परिणाम भोगावे लागतील, अशी धमकीच त्याने दिली आहे.
मेजर गोगोई प्रकरण काय होते?
तरुणाचा मानवी ढाल म्हणून वापर करणारे मेजर नितीन लितूल गोगोई हे एका तरुणीसोबत हॉटेलमध्ये गेल्याने वादाच्या भोवऱ्यात अडकले. तरुणीसोबत गेल्याने हॉटेल कर्मचाऱ्याने त्या दोघांना प्रवेश नाकरला. तेव्हा वाद होऊन हे प्रकरण पोलिसांकडे पोहोचले होते. चौकशीनंतर गोगोईंची सुटका झाली. पण लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले. त्या मुलीने स्वेच्छेनेच गोगोईंसोबत हॉटेलमध्ये गेल्याचे म्हटले होते.