हॉलिवूड अभिनेते बर्ट रेनॉल्ड्स यांचे हृदयविकाराच्या झटक्याने फ्लोरिडा येथे निधन झाले. ते ८२ वर्षांचे होते. डॅन ऑगस्ट आणि गन स्मोकसारख्या अनेक टीव्ही शोमधून त्यांनी विविध भूमिका साकारल्या होत्या. तर १९९७ मध्ये बुगी नाइट्स या सिनेमासाठी ऑस्कर नामांकन मिळाले होते. इव्हिनिंग शेड्स या सिनेमातील भूमिकेसाठी बर्ट रेनॉल्ड्स यांना गोल्डन ग्लोब पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हॉलिवूड सिनेसृष्टी आणि टीव्ही यामध्ये बर्ट रेनॉल्ड यांची कारकीर्द प्रदीर्घ होती. ‘वन्स अपॉन अ टाइम इन हॉलिवुड’या सिनेमासह इतर काही सिनेमांमध्ये ते आत्ताही काम करत होते. या सिनेमात त्यांच्यासोबत ब्रॅड पिट आणि लिओनार्दो डी कॅप्रिओही यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. अँजल बेबी हा १९६१ मध्ये आलेला त्यांचा पहिला सिनेमा होता. ‘अवर मॅन फ्लिंट’, ‘व्हाइट लाइटनिंग’, ‘द मॅन हू लव्ह्ड कॅट डान्सिंग’, ‘लकी लेडी’ यांसारख्या सिनेमांनी त्यांना प्रसिद्धीच्या शिखरावर पोहचवले. त्यांना जेम्स बॉन्डच्या भूमिकेसाठीही विचारणा झाली होती. मात्र एक अमेरिकन अभिनेता कधीही जेम्स बॉन्ड साकारू शकत नाही असे म्हणत त्यांनी ती नाकारली.

बर्ट रेनॉल्ड्स यांच्या निधनाचे वृत्त त्यांच्या पुतणीने दिले. माझे काका बर्ट रेनॉल्ड्स हे एक उत्तम अभिनेते, संवेदनशील माणूस होते. त्यांनी त्यांचे आयुष्य कुटुंब, मित्र, चाहते आणि त्यांच्या विद्यार्थ्यांसाठी घालवले. गेल्या काही दिवसांपासून त्यांची तब्बेत बिघडली होती. मात्र त्यांना हृदयविकाराचा झटका येईल आणि त्यांचा मृत्यू होईल असे वाटले नव्हते. ज्या चाहत्यांनी त्यांच्यावर मनापासून प्रेम केले त्या सगळ्यांचे मी आभार मानते अशी प्रतिक्रिया बर्ट रेनॉल्ड्स यांची पुतणी नॅन्सी लीने दिली आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hollywood actor burt reynolds passes away
First published on: 07-09-2018 at 04:54 IST