अहमदाबाद : विमान दुर्घटनेनंतर काँग्रेस आणि भाजप यांच्यात वाद सुरू झाला आहे. गृहमंत्री अमित शहा यांनी केलेल्या वक्तव्याला काँग्रेसने असंवेदनशील म्हटले असून, त्यांनी जबाबदारीने बोलायला पाहिजे, असे वक्तव्य काँग्रेसने केले. तर भाजपने त्याला प्रत्युत्तर दिले आहे. काँग्रेसची शहा यांच्यावरील टीका लज्जास्पद असून पीडितांच्या पाठिशी आम्ही ठामपणे उभे आहोत, असे भाजपने सांगितले.
अहमदाबाद विमान अपघातानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गुरुवारी संध्याकाळी घटनास्थळाची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी केलेल्या वक्तव्याची चित्रफीत काँग्रेसचे माध्यम व प्रसिद्धी विभागाचे प्रमुख पवन खेरा यांनी समाज माध्यमांवर प्रसिद्ध करत त्यांच्यावर टीका केली. ‘‘हा एक अपघात असून अशा प्रकारचे अपघात कोणीही रोखू शकत नाही,’’ असे गृहमंत्र्यांचे वक्तव्य अत्यंत असंवेदनशील आहे. विमान अपघातात लोकांचा मृत्यू झाला, तर गृहमंत्री किमान जबाबदारीचे आश्वासन देऊ शकतात.
नशिबावर भाषण देऊ शकत नाही. ‘अपघात रोखू शकत नाही,’ असे बोलणे म्हणजे जबाबदारीपासून पळून जाणे आहे. जर काहीही थांबवता येत नसेल, तर आपल्याकडे मंत्रालये का आहेत, असा सवाल खेरा यांनी ‘एक्स’वर केला. अपघात हे नशिबाने झालेले कृत्य नाहीत. ते टाळता येण्याजोगे आहेत. आपल्याकडे विमान वाहतूक नियामक, सुरक्षा यंत्रणा आणि संकट प्रतिसाद प्रणाली आहेत, असे खेरा म्हणाले.
भाजपचे प्रत्युत्तर
गृहमंत्री शहा यांच्या वक्तव्यावर काँग्रेसने टीका केल्यानंतर त्याला भाजपने प्रत्युत्तर दिले. विमान अपघातानंतर विरोधी पक्षाने त्याचेही राजकारण सुरू केले आहे. त्यांची टीका लज्जास्पद आहे, असे भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते प्रदीप भंडारी म्हणाले. ‘‘जेव्हा देश एअर इंडिया अपघाताबाबत शोक करत असताना काँग्रेसने राजकारण सुरू केले. गृहमंत्री शहा यांच्या चित्रफितीमध्ये काँग्रेस बनावट बातम्या पसरवण्यासाठी फेरफार करते, असा आरोप केला आहे.