गेल्या काही महिन्यांपासून अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि मनोरंजन या विषयांवर सोशल मिडियावर आणि राजकीय वर्तुळातही जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. आधी समय रैनाच्या इंडिज गॉट लॅटेंट शोमधील अश्लील संवादांवर मोठी टीका झाली. नंतर स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराच्या एका कवितेवरून प्रकरण थेट न्यायालयात जाऊन पोहोचलं. या पार्श्वभूमीवर अभिव्यक्ती स्वातंत्र्याबाबत आणि ओटीटी प्लॅटफॉर्म्सवरील सेन्सॉरबाबत गंभीर चर्चा चालू असतानाच आणखी एका शोमुळे मोठा वाद निर्माण झाला आहे.

House Arrest Show वर बंदीची मागणी

Ullu App वर प्रदर्शित होणाऱ्या Hous Arrest या शोमुळे सध्या सोशल मीडियावर तुफान चर्चा पाहायला मिळत आहे. अभिनेता एजाज खान या शोचा होस्ट आहे. या शोच्या काही भागांमध्ये स्पर्धकांना एजाज खाननं अश्लील कृत्य करण्यास लावल्याच्या व्हिडीओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्या आहेत. एकीकडे इंडियाज गॉट लॅटेंटसारख्या शोवर बंदी घातलेली असताना त्याच न्यायाने एजाज खानच्या ‘हाऊस अरेस्ट’ या शोवरदेखील बंदी घालण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

ठाकरे गटाचा हल्लाबोल

दरम्यान, या शोच्या क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्यावर संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. शिवसेना (उद्धव ठाकरे) खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी यासंदर्भात सोशल मीडियावर सविस्तर पोस्ट शेअर केली आहे. चतुर्वेदींनी व्हायरल क्लिपपैकी एक क्लिप शेअर केली आहे. या क्लिपमध्ये एजाज खान स्पर्धकांना सेक्स पोजिशन दाखवण्यास सांगताना दिसत आहे. या क्लिपसोबत प्रियांका चतुर्वेदींनी त्यांचा आक्षेप नोंदवला आहे.

“मी हा मुद्दा संसदीय समितीसमोर उपस्थित केला आहे. केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाने जारी केलेल्या बंदीच्या आदेशातून उल्लू व अल्ट बालाजीसारखे अॅप निसटले आहेत. मी उपस्थित केलेल्या मुद्द्यावर अद्याप मला उत्तर मिळालेलं नाही”, असं चतुर्वेदींनी या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

शोच्या व्हिडीओ क्लिप व्हायरल, कारवाई होणार का?

दरम्यान, या शोमधून अश्लील कंटेंट समाजात पसरवला जात असल्याच्या तक्रारी सोशल मीडियावर केल्या जाऊ लागल्या आहेत. या शोमधील व्हायरल क्लिपच्या कमेंट बॉक्समध्ये युजर्सच्या संतप्त प्रतिक्रिया दिसत आहेत. अशा शोवर तातडीनं बंदी घातली जायला हवी, अशी मागणी केली जात आहे. या पार्श्वभूमीवर ‘इंडियाज गॉट लॅटेंट’प्रमाणेच ‘हाऊस अरेस्ट’ शोवरदेखील बंदी घातली जाईल का? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.