What is Indias Got Latent Show : प्रसिद्ध यूट्यूबर रणवीर अलाहबादियाने समय रैनाच्या ‘इंडियाज गॉट लेटेंट’च्या कार्यक्रमात अश्लील आणि वादग्रस्त टिप्पणी केल्यानंतर संबंध देशात संताप व्यक्त करण्यात येत आहे. मुंबई आणि आसाममध्ये ‘इंडिया गॉट लेटेंट’चे आयोजक आणि रणवीरसह अपूर्वा मखीजा, समय रैना यांच्याविरोधात तक्रार दाखल झाली असून या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. दरम्यान, हा कार्यक्रम नक्की काय आहे? या कार्यक्रमाचं स्वरुप काय? कोणते स्पर्धक यात सहभागी होतात? परीक्षक कोण असतात? याविषयी आपण अधिक जाणून घेऊयात.

जवळपास सात महिन्यांपूर्वी विनोदी कलाकार समय रैनाने ‘इंडियाज गॉट लेटेंट’ हा शो युट्यूबवर लाँच केला. ‘इंडियाज गॉट टॅलेंट’ या जुन्या रिअॅलिटी कार्यक्रमाशी मिळते-जुळतं असलेल्या या शीर्षकाकडे आधी प्रेक्षकांचं लक्ष वेधलं गेलं. कारण, इंडियाज गॉट टॅलेंट हा कार्यक्रम जवळपास १० सीझन चालला.

उद्योजक बलराज सिंग घई यांच्यासोबत तो समय रैना हा कार्यक्रम करतो. डार्क कॉमेडी, अश्लील टिप्पणी, क्रूर आणि अपमानास्पद विनोद या कार्यक्रमात होत असल्याने प्रेक्षकांमध्ये हा कार्यक्रम हिट झाला. या कार्यक्रमावर आधीही टीका झाली होती. पण रविवारी, युट्यूबर-पॉडकास्टर रणवीर अलाहबादियाने एका स्पर्धकाला केलेले अश्लील प्रश्न अधिक वादग्रस्त ठरले. सोशल मीडियावर यावर मोठी टीका झाली आणि शोमध्ये अश्लील भाषा वापरल्याबद्दल समय रैना, रणवीर अलाहबादिया, अपूर्व मुखिजा आणि इतरांविरुद्ध पोलिस तक्रार दाखल करण्यात आली.

या कार्यक्रमाचं स्वरुप काय आहे?

इंडियाज गॉट लेटेंट स्पर्धकांना त्यांच्या अनोख्या आणि अनेकदा विचित्र कौशल्यांचे प्रदर्शन करण्यासाठी एक व्यासपीठ देते. कविता, जादू, विनोद, गायन आणि नृत्य अशा कोणत्याही कला तुम्ही सादर करू शकता. पारंपारिक टॅलेंट कार्यक्रमांना फाटा देत समय रैनाच्या या प्लॅटफॉर्मने मनोरंजन आणि विनोदावर भर दिला. या कार्यक्रमात येणारे विशेष पाहुणे स्पर्धकांच्या सादरीकरणावर हलक्याफुलक्या टीका करतात. इतर कार्यक्रमांपेक्षा हे वेगळे आहे की प्रत्येक नवीन भागात या कार्यक्रमात परीक्षकांचा एक नवीन पॅनेल असतो.

स्पर्धकांना गुण कसे मिळतात?

या शोमध्ये एका अनोख्या स्कोअरिंग फॉरमॅटचा देखील समावेश आहे. स्पर्धकांना त्यांची प्रतिभा दाखवण्यासाठी ९० सेकंदांचा वेळ असतो. त्यांची वेळ सुरू होण्यापूर्वी स्पर्धकांना त्यांना मिळणाऱ्या गुणांचा अंदाज लावायला सांगितला जातो. त्यानंतर त्यांची कला सादर करून झाल्यानंतर परीक्षक त्यांना जे गुण देतात ते स्पर्धकांनी अंदाज लावलेल्या गुणांशी जुळले तर ते तो शो जिंकतात. जिंकलेल्या स्पर्धकाला त्या दिवसाच्या तिकिट विक्रीतून मिळणारे उत्पन्न बक्षिस म्हणून दिले जाते. या फॉरमॅटचा उद्देश स्पर्धक किती आत्म-जागरूक आहेत याची चाचणी करणे आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.