सोशल मीडियामुळं गुन्हेगारी प्रकरणांमध्ये वाढ होत असल्याची अनेक प्रकरणं आजवर समोर आलेली आहेत. मात्र गुजरातमधील राजकोट येथे घडलेल्या एका प्रकरणामुळ सर्वांनाच धक्का बसला. एका फेसबुक पोस्टमुळं झालेला वाद २० वर्षीय तरूणाच्या जीवावर बेतला. यानंतर पोलिसांनी आता आरोपींवर कडक कलमे लावण्याची तयारी केली आहे. राजकोट सिव्हिल रुग्णालयात उपचार घेत असलेल्या प्रिन्सकुमार अनिल भिंड या तरूणाचा सोमवारी मृत्यू झाला. मृत्यूची माहिती समजल्यानंतर या प्रकरणाचा तपास करत असलेल्या भक्तीनगर पोलीस ठाण्यातील हेड कॉन्स्टेबलने याची माहिती वरिष्ठांना दिली.

सदर प्रकरणाचा तपास करत असलेल्या एका पोलीस अधिकाऱ्याने द इंडियन एक्सप्रेसशी बोलताना सांगितले की, काही दिवसांपूर्वी बिहारमधील मजुरांमध्ये बाचाबाचीनंतर हाणामारी झाली होती. ज्यात प्रिन्सकुमार जखमी झाला. सदर प्रकरणात एफआयआर दाखल झाल्यानंतर आम्ही त्याच्या दुखापतीची माहती डॉक्टरांकडून घेतली होती.

प्रिन्सकुमारची परिस्थिती सामान्य असल्याचे डॉक्टर म्हणाले होते. तसेच प्रिन्सही पूर्णपणे शुद्धीवर होता. रुग्णालयात असताना त्यानेच याबद्दलची तक्रार दिली होती. हेड कॉन्स्टेबल दर दोन दिवसांनी त्याची रुग्णालयात जाऊन चौकशी करत होते. परंतु त्याचा अचानक मृत्यू झाला. यानंतर आता त्याच्या शवविच्छेदन अहवालाची पोलीस वाट पाहत आहेत.

नेमका वाद काय झाला?

प्रिन्सकुमारने १२ सप्टेंबर रोजी दाखल केलेल्या एफआयआरमध्ये सदर प्रकरणाची माहिती दिली होती. बिहारमधील कैमूर जिल्ह्यातून आलेला प्रिन्स त्याच्या चुलत भावांसह राजकोट येथील कारखान्यात काम करत होता. याच गावातील काही इतर तरूणही राजकोटमध्ये काम करतात. काही दिवसांपूर्वी त्याचे आजोबा रुपनारायण भिंड यांचे निधन झाले. याबद्दल प्रिन्सनं फेसबुकवर पोस्ट टाकली.

सदर पोस्टवर त्याच्याच गावातील रहिवासी असलेल्या आरोपी बिपीनकुमार गोंड याने हसण्याची इमोजी पोस्ट केली. यानंतर त्यांच्यात फोनवर वाद झाला. १२ सप्टेंबर रोजी बिपीन गोंड आणि ब्रिजेश गोंड यांनी प्रिन्सकुमारला त्याच्या कारखान्याजवळ गाठले आणि जीवे मारण्याची धमकी दिली. यावेळी बिपीन गोंड याने प्रिन्सच्या पाठीत चाकू खुपसला. त्यानंतर दोघेही पळून गेले.

जखमी प्रिन्सला त्याच्या कारखान्यातील कामगारांनी आधी खासगी रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर राजकोटच्या सिव्हिल रुग्णालयात हलवले. भक्तीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक एम. एम. सर्वैया यांनी सांगितले की, चाकू हल्ल्यानंतर प्रिन्सची प्रकृती स्थिर होती. मात्र काही दिवसांपूर्वी त्याला अतिदक्षका विभागात हलवावे लागले. २२ सप्टेंबरच्या सकाळी त्याचा मृत्यू झाला. यानंतर बिपीन गोंडला अटक केली आहे. तर ब्रिजेश गोंड फरार असून त्याचा शोध घेतला जात आहे.