How does Trump want to be remembered? US president respond : डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून दुसर्यांदा निवडून आल्यापासून चर्चेत आहेत. जगभरातील देशांवर टॅरिफ लादण्यापासून ते इराणमध्ये बॉम्ब टाकण्यापर्यंत त्यांच्या निर्णयाचे पडसाद जगभरात उमटताना पाहायला मिळतात. जगातील सर्वात शक्तिशाली देशांपैकी एक असलेल्या अमेरिकेचे नेतृत्व सध्या त्यांच्याकडे आहे. इतिहासात त्यांनी केलेल्या सर्व चांगल्या आणि वाईट कामांची नोंद ठेवली जाईल. मात्र त्यांना स्वत:ला इतिहासात कसे लक्षात ठेवले जावे असे त्यांना वाटते, असा प्रश्न ट्रम्प यांना नुकतेच एका मुलाखतीत विचारण्यात आला. यावर अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी थेट शब्दात उत्तर दिले आहे.
ट्रम्प काय म्हणाले?
राष्ट्राध्यक्ष पद सोडल्यानंतर त्यांची नोंद इतिहासात कशी ठेवली जावी आणि त्यांच्या राष्ट्राध्यक्ष म्हणून केलेल्या कामांबद्दल कसे पाहिले जावे? याबद्दल मत व्यक्त करताना ट्रम्प म्हणाले की, “एक चांगला माणूस, पण असा व्यक्ती ज्याने आपल्या देशाला वाचवले,” म्हणून आपल्याला लक्षात ठेवले जावे असे ट्रम्प म्हणाले आहेत.
“मला खात्री होती की देश पतनाकडे जात होता. आपण पुन्हा वर येऊ शकलो असतो की नाही, मला खरंच माहिती नाही. आपण खूप काठावर येऊन पोहचला होतो आणि मला खरोखरच आपला देश वाचवणारा व्यक्ती म्हणून ओळखले गेलेले आवडेल,” असे डोनाल्ड ट्रम्प म्हणाले आहेत. ट्रम्प फॉक्स न्यूजला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.
डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या २०२४ च्या संपूर्ण प्रचार मोहिमेदरम्यान जनतेसमोर देशाचे निराशाजनक चित्र उभे केले होते. या निवडणुकीत ट्रम्प यांना मोठा विजय मिळाला आणि ते व्हाईट हाऊसमध्ये परतले.
यामध्ये त्यांनी बायडन यांच्या कारकिर्दीत तयार झालेले सीमा संकट, महागाई, पराराष्ट्र धोरण या मुद्द्यांना सातत्याने लक्ष्य केले होते आणि ट्रम्प यांच्या दुसर्या कार्यकाळात याच मुद्द्यांवर त्यांचा भर राहिला आहे.
दरम्यान वर्षभरापूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर एका प्रचारसभेत जीवघेणा हल्ला झाला होता. या घटनेचा तपास आता पूर्ण झाला असून अमेरिकेच्या संसदीय समितीने त्यासंदर्भातील अहवाल सादर केला आहे. विशेष बाब म्हणजे- या अहवालात अमेरिकेतील गुप्तचर यंत्रणांच्या कार्यपद्धतींवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं आहे. तसेच या प्रकरणातील दोषींवर कठोरात कठोर कारवाई करावी, अशी शिफारसही त्यात करण्यात आली आहे.
१३ जुलै २०२४ रोजी पेनसिल्वेनियातील बटलर शहरातील एका प्रचारसभेदरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर गोळीबार झाला होता. या हल्ल्यातून ते थोडक्यात वाचले होते आणि हल्लेखोराने धाडलेली गोळी त्यांच्या कानाला चाटून गेली होती. त्यानंतर पोलिसांनी २० वर्षीय थॉमस क्रूक्स या हल्लेखोराला ठार मारले होते. या घटनेत एका अमेरिकन नागरिकाचा मृत्यूही झाला होता. दरम्यान, या प्रकरणावर अमेरिकेतील सीनेटच्या होमलँड सिक्युरिटी अँड गव्हर्नमेंटल अफेअर्स कमिटीने एक अहवाल सादर केला आहे.