Bank of India Fraud: उद्योगपती, कॉर्पोरेट कंपन्या किंवा बँकांचे वरीष्ठ अधिकारी बँकेंना चुना लावतात, अशा प्रकरणांच्या बातम्या तुम्ही वाचल्या असतील. पण बँकेतील कर्मचारी १६ कोटी रुपयांचा गंडा घालू शकतो, हे ऐकलं तर आपल्याला नवल वाटेल. पण बँक ऑफ इंडिया सारख्या सार्वजनिक क्षेत्रातील मोठ्या बँकेला एका कर्मचाऱ्याने गंडवलं आहे. या कर्मचाऱ्याने १६.१० कोटी रुपयांची रक्कम लुटून ती शेअर मार्केट, क्रिप्टो आणि इंटरनेट गेम्सवर उडवली.

सदर बँक कर्मचाऱ्याला गुजरातमध्ये चालत्या ट्रेनमधून अटक करण्यात आली. हितेश सिंगला असं या ३२ वर्षीय आरोपीचं नाव आहे. अटक केल्यानंतर त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

सिंगला काही महिन्यांपासून कामावर येण्याचं बंद झाला. तसेत खात्यांमधील तफावतींबद्दल अंतर्गत लेखापरिक्षणात चिंता व्यक्त झाल्यानंतर सदर बँक घोटाळा उघडकीस आला. यानंतर बँक ऑफ इंडियाने केंद्रीय अन्वेषण विभागाला (सीबीआय) याची माहिती दिली. ऑगस्ट महिन्यात याबद्दल तातडीने एफआयआर दाखल करण्यात आला आणि देशभरात सिंगलाची शोधमोहीम सुरू झाली.

आरोपीनं घोटाळा कसा केला?

ईडीच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सिंगलाने मे २०२३ ते जुलै २०२५ पर्यंत पद्धतशीरपणे घोटाळा केला. मुदत ठेवी, पीपीएफ, ज्येष्ठ नागरिक योजना आणि काही निष्क्रिया खात्यांचा निपटारा करण्यासाठी अंतर्गत बँकिंग प्रणालींमध्ये फेरफार केला.

ज्येष्ठ नागरिक, अल्पवयीन, मृत व्यक्ती आणि ज्यांनी आपल्या खात्यावरचे बॅलन्स अनेक वर्ष तपासलेले नाही, अशा असुरक्षित गटातील ग्राहकांना आणि खातेधारकांना सिंगलाने लक्ष्य केले.

अशा निष्क्रिय खात्यामधील रक्कम सिंगला याने स्वतःच्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या खात्यांमध्ये वळवली. तपासकर्त्यांचा दावा आहे की, हस्तांतरण लहान हप्त्यांमध्ये विभागले गेले होते. ज्यामुळे फसवणुकीचे प्रकार सुरुवातीला उघड होऊ शकले नाहीत. अनेक महिने बिनदिक्कतपणे सिंगला हे व्यवहार करत होता.

बँकेतून लुटलेले ९० टक्के पैसे सिंगलाने शेअर मार्केटच्या फ्युचर्स अँड ऑप्शन ट्रेडिंगमध्ये, क्रिप्टो टोकन्स आणि ऑनलाईन जुगारात उडवले. ईडीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, सध्या गुन्ह्यातील रक्कम उरलेली नाही. आरोपीने ९० टक्के पैसे जुगारात उडवले. तसेच काही रक्कम स्वतःवर खर्च केली.

सिंगलाने मुंबईतील एका मैत्रिणीजवळ तात्पुरते ठेवलेले १.५ कोटी रुपयेही त्याने जुगारावर उधळले. अधिकाऱ्यांनी या मैत्रिणीच्या घरावर छापा टाकला असता तिथे पैसे आढळून आले नाहीत.