मोदी सरकारच्या नव्या ३ कृषी कायद्यांविरोधात आक्रमक झालेल्या शेतकऱ्यांनी देशाची राजधानी दिल्लीतून देशव्यापी भारत बंदची हाक दिली. त्याला सर्वत्र मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. या पार्श्वभूमीवर दिल्लीच्या सीमेवर चोख सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आलीय. येणारं जाणारं प्रत्येक वाहन सुरक्षा दलाकडून तपासलं जात आहे. मात्र, यामुळे दिल्ली गुडगाव सीमेवर वाहनांचा मोठा खोळंबा झालाय. शेकडो वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या पाहायला मिळत आहेत. दिल्लीच्या प्रत्येक सीमेवर जवळपास हेच चित्र आहे.

“नागरिकांना भारत बंदची माहिती आधी दिलेली, दुर्लक्ष केल्यानं वाहतूक कोंडी”

ट्रॅफिकमध्ये अडकलेल्यांकडून सोशल मीडियावर संतापही व्यक्त केला जातोय. याला आता शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी उत्तर दिलंय. ते म्हणाले, “नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून शेतकऱ्यांच्या मागणीसाठी भारत बंद होणार आहे याची माहिती आधीच देण्यात आली होती. या भारत बंदच्या काळात सकाळी ६ ते सांयकाळी ४ या वेळेत वाहतूक खोळंबा होऊ शकतो याबाबत आम्ही आधीच सतर्क केलं होतं. ज्यांनी या माहितीकडे दुर्लक्ष केलं त्यांना या अडचणीला सामोरं जावं लागत आहे.”

” आमचं आंदोलन सुरूच ठेऊ, १० वर्षे लागली तरी चालतील”

“नागरिकांनी दुपारच्या जेवणानंतर घराबाहेर पडावं असं आम्ही नागरिकांना आवाहन केलं होतं. मात्र, याकडे कुणीही लक्ष दिलं नाही. जोपर्यंत नवे कृषी कायदे मागे घेतले जात नाहीत तोपर्यंत आम्ही आमचं आंदोलन सुरूच ठेऊ. यासाठी १० वर्षे लागली तरी चालतील,” असंही राकेश टिकैत यांनी नमूद केलं.

विरोधी पक्षांकडून भारत बंदला पाठिंबा

काँग्रेस नेते राहुल गांधी, समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांच्यासह देशातील अनेक विरोधी पक्षांनी शेतकऱ्यांच्या या भारत बंदला पाठिंबा दिलाय. राहुल गांधी म्हणाले, “शेतकऱ्यांचा अहिंसक सत्याग्रह अखंडपणे सुरू आहे. मात्र, शेतकऱ्यांचं शोषण करणाऱ्या सरकारला हे आवडत नसल्यानं हा भारत बंद आहे.”

“शेतकरी आंदोलन आता भाजपमध्ये फूट पडण्याचं कारण बनेल”

“देशाच्या अन्नदात्याचा सन्मान न करणाऱ्या दांभिक भाजपने सत्तेत राहण्याचा नैतिक अधिकार गमावला आहे. शेतकरी आंदोलन आता भाजपमध्ये फूट पडण्याचं कारण बनत आहे,” असं मत अखिलेश यादव यांनी व्यक्त केलं.

४० शेतकरी संघटनांची समन्वय समिती असलेल्या संयुक्त किसान मोर्चाने कृषी कायद्याविरोधात दंड थोपटत भारत बंदची घोषणा केलीय. ५ सप्टेंबर रोजी मुजफ्फरपूर येथे झालेल्या सभेत ही घोषणा करण्यात आली होती.

केंद्राच्या तीन कृषी कायद्यांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी गेल्या वर्षी २७ सप्टेंबरला मंजुरी दिली होती. त्यास एक वर्ष पूर्ण होत असताना हा ‘भारत बंद’ पुकारण्यात आला आहे. सकाळी ६ पासून दुपारी ४ वाजेपर्यंत पाळल्या जाणाऱ्या बंददरम्यान देशभरातील सर्व सरकारी व खासगी कार्यालये, शैक्षणिक व इतर संस्था, दुकाने, उद्योग आणि व्यावसायिक प्रतिष्ठाने बंद राहतील, तसेच सार्वजनिक कार्यक्रम होणार नाहीत. रुग्णालये, औषधांची दुकाने यांच्यासह सर्व अत्यावश्यक सेवा सुरू राहील.