Madhya Pradesh : मध्य प्रदेशातील रीवा जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. एका २६ वर्षीय तरुणाने आपल्या इन्स्टाग्राम पेजवरून लाईव्ह करून स्वत:चं जीवन संपवलं आहे. यावेळी त्या तरुणाची पत्नी देखील लाईव्ह स्ट्रीमिंगमध्ये सहभागी होती आणि तब्बल ४४ मिनिटे ती लाईव्ह पाहत होती. मात्र, तिने पतीला रोखण्याचा कोणताही प्रयत्न केला नाही. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

२६ वर्षीय तरुणाने लाईव्ह करत जीवन संपवल्याची ही घटना रेवा जिल्ह्यात घडली. या घटनेत आता या तरुणाची पत्नी प्रिया शर्मा आणि तिच्या आईला अटक करण्यात आल्याची माहिती सांगितली जात आहे. शिवप्रकाश त्रिपाठी असं त्या तरुणाचं नाव होतं. या तरुणाने पत्नी आणि सासूकडून होणाऱ्या छळाला कंटाळून जीवन संपवल्याचा आरोप आहे. या संदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे.

या तरुणाने हे कठोर पाऊल उचलण्यापूर्वी घरगुती वाद मिटवण्याबाबत पत्नीशी चर्चा केली होती. मात्र, पत्नीने न ऐकल्यामुळे त्याने हा निर्णय घेतल्याचं सांगितलं जात आहे. शिवप्रकाश त्रिपाठी याने दोन वर्षांपूर्वी शर्माशी लग्न केलं होतं. सुरुवातीला त्यांचं नातं चांगलं राहिलं. परंतु काही महिन्यांनंतर त्याला कळलं की ती दुसऱ्या कोणाशी संवाद साधत आहे. यातच त्याचा अपघात झाला, त्या अपघातात तो गंभीर जखमी झाला. मात्र, याच काळात पत्नी त्यांच्या मुलाला घेऊन तिच्या पालकांच्या घरी गेली. त्यानंतरही तो तिला परत आणण्यासाठी प्रयत्न करत होता, पण तिने परत येण्यास नकार दिला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

घटनेच्या दिवशी हा तरुण पत्नीला समजावण्यासाठी गेला होता. पण त्याला अपमानित करत मारहाण करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच त्यानंतर तो पुन्हा घरी परतला आणि स्वतःला एका खोलीत बंद करून घेतलं. त्यानंतर त्याने लगेचच इंस्टाग्रामवर लाईव्ह व्हिडीओ सुरु केला आणि जीवन संपवलं. मात्र, पतीचं लाईव्ह पत्नीने ४४ मिनिटे पाहिलं. पण तरीही कोणालाही कळवलं नाही किंवा पतीला वाचवण्यासाठी कोणतेही प्रयत्न केले नाही. दरम्यान, या घटनेबाबत पोलिसांनी माहिती देताना सांगितलं की, त्या तरुणाच्या पत्नीचे विवाहबाह्य संबंधांचे पुरावे समोर आले आहेत. घरगुती वादातून ही घटना घडली असून घटनेचा पुढील तपास सुरू आहे.