Newlywed Couple Dispute: नवीन लग्न झाल्यानंतर पती-पत्नी नव्या आयुष्याची स्वप्नं पाहत असतात. पण बंगळुरूमध्ये एका विचित्र वैवाहिक वादाची सध्या चर्चा होत आहे. नवीन लग्न झालेल्या पती-पत्नीचा वाद इतका टोकाला गेला की, पत्नीनं थेट पतीकडून दोन कोटी रुपयांची मागणी केली. लग्नाच्या पहिल्या रात्री आणि त्यानंतर काही दिवस पतीनं शारीरिक संबंध ठेवले नाहीत, म्हणून संतापलेल्या पत्नीनं त्याच्याकडून नुकसान भरपाई मागितली. आता हे प्रकरण पोलीस ठाण्यात पोहोचले आहे.
प्रकरण काय?
बंगळुरूच्या गोविंदराज नगर येथे राहणाऱ्या प्रवीण नामक व्यक्तीचे लग्न ५ मे २०२५ रोजी चंदना नावाच्या महिलेशी झाले होते. लग्नानंतर बंगळुरूच्या सप्तगिरी पॅलेस येथे भव्य असा रिसेप्शन सोहळाही पार पडला. याचा खर्च प्रवीणच्या कुटुंबाने उचलला असल्याची माहिती काही वृत्त संकेतस्थळांनी दिली. सर्व विधी पार पडल्यानंतर चंदना सासरी आली.
पहिल्या रात्री झाला वाद
१६ मे रोजी प्रवीणच्या मावशीच्या घरी मधुचंद्राचा कार्यक्रम झाला. मात्र कोणत्यातरी कारणावरून पहिल्या रात्री नवदाम्पत्यामध्ये शारीरिक संबंध प्रस्थापित होऊ शकले नाहीत. पुढचे काही दिवस अशीच स्थिती राहिली. या कारणावरून चंदनानं भांडण केलं. तिनं पतीला टोमणे मारले आणि तो नपुंसक असल्याचंही तिनं म्हटलं.
१९ मे रोजी चंदनानं प्रवीणला तिच्या काकांच्या घरी नेलं. तिथं तिने सगळा प्रकार सांगितला. त्यानंतर २१ मे रोजी चंदनाचे कुटुंबीय, इतर नातेवाईक प्रवीणच्या घरी आले आणि त्यांनी जोरदार हंगामा केला. प्रवीणची वैद्यकीय तपासणी झाली पाहीजे, अशी मागणी चंदनाच्या नातेवाईकांनी केली.
२४ मे रोजी प्रवीणची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. अपोलो रुग्णालयातील डॉक्टरांनी स्पष्ट केले की, प्रवीण शारीरिकदृष्ट्या निरोगी असून शारीरिक संबंध प्रस्थापित करण्यासाठी सक्षम आहे. मात्र तो मानसिक तणावात असल्यामुळे कदाचित तयार नसेल. मात्र डॉक्टरांनी सांगितल्यानंतरही पत्नीचं समाधान झालं नाही.
दोन कोटी रुपयांची मागणी
प्रवीणनं आरोप केला आहे की, त्याच्या पत्नी आणि तिच्या कुटुंबियांनी मारहाण करत त्याच्यावर दबाव टाकला. तसेच पंचायत बसवून दोन कोटी रुपयांची संपत्ती स्वतःच्या नावावर करून देण्याची मागणी केली. १९ जून रोजी चंदना सर्व सामान घेऊन माहेरी परतली. १७ ऑगस्ट रोजी प्रवीण मंदिरातून आपल्या घरी परताल तेव्हा चंदना आणि तिचे नातेवाईक हातात शस्त्र घेऊन त्याची वाट पाहत होते. त्यांनी प्रवीणवर हल्ला केला. तसेच घराचे नुकसान केले.
प्रवीणनं आरोप केला की, पत्नी चंदना आणि तिचे नातेवाईक त्याच्या संपत्तीवर डोळा ठेवून आहेत. त्याची संपत्ती त्यांना हडप करायची आहे. यानंतर त्याने सासरच्या लोकांविरोधात गोविंदराज नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.