Hyderabad terror bid foiled : तेलंगणा पोलिसांनी आंध्र पोलिसांबरोबरच्या संयुक्त कारवाईत हैदराबाद येथे बॉम्बस्फोट घडवून आणण्याचा कट उधळून लावला आहे. या कारवाईत दोन दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे, ज्यापैकी एकाचे नाव सिराज असून तो विजयनगरम येथील आहे, तर दुसरा समीर हा हैदराबादचा आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हे दोघे हैदराबाद शहरात डमी स्फोट घडवून आणण्याचा कट रचत होते असा आरोप आहे.

सिराज याने योजनेनुसार विजयनगरम येथून स्फोटके खरेदी केले होते. तसेच या दोघांना सौदी अरेबिया येथील आयएसआयएस मॉड्यूलकडून सूचना देण्यात येत होत्या. तसेच हैदराबादमध्ये बॉम्बस्फोट घडवून आणण्यासाठी या दोघांना मार्गदर्शन केले जात होते. सध्या या दहशतवादी गटाशी संबंध असलेल्या दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. या संयुक्त कारवाईमध्ये तेलंगणा काऊंटर इंटेलिजन्स आणि आंध्र प्रदेश इंटेलिजन्स यांचा समावेश होता. इंडिया टुडेने यासंबंधीचे वृत्त दिले आहे.

पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी जम्मू आणि काश्मीर याच्यासह देशातील इतर अनेक राज्यांमध्ये दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी शोधमोहिम सुरू केली आहे.

राष्ट्रीय तपास यंत्रणेने शुक्रवारी पंजाबमधील १५ ठिकाणी छापेमारी केली. पाकिस्तानातील खलीस्तानी दहशतवादी हरविंदर सिंग उर्फ रिंडा याच्याशी संबंधीत गँगस्टर हॅप्पी पास्सीयन याच्या ठिकाणांवर ही छापेमारी करण्यात आली. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात गुरदासपूर येते पोलीस ठाण्यावर ग्रेनेड हल्ला झाला होता, त्याच्याशी संबंधीत प्रकरणात ही कारवाई करण्यात आली.

२२ एप्रिल रोजी, जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांवर गोळीबार केला होता. या हल्ल्यात सहभागी दहशतवाद्यांमध्ये पाकिस्तानी नागरिक आणि लष्कर-ए-तैयबाशी संबंधित स्थानिक सदस्यांचा समावेश होता. सुरक्षा अधिकार्‍यांनी गुन्हेगारांची ओळख पटवली असली तरी, ते फरार आहेत आणि घटनास्थळावरून पळून गेल्यानंतर त्यांचा अद्याप शोध लागलेला नाही.