Indian Woman Ashamed After Diwali Fire In Canada: कॅनडाच्या एडमंटनमध्ये दिवाळी उत्सवादरम्यान फटाके फोडताना दोन घरांना आग लागली होती. एडमंटन पोलिसांनी आपल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, याप्रकरणी तीन जणांवर जाळपोळ केल्याचा आरोप आहे. या आगीच्या घटनेमुळे फेसबुकवरील मिल वुड्स कम्युनिटी ग्रुपमध्ये वाद सुरू झाला असून अनेक भारतीयांनी या आगीच्या घटनेवर आपले मत व्यक्त केले आहे. यामध्ये एका भारतीय महिलेने, “मी भारतीय आहे, पण आज मला हे सांगायला लाज वाटते”, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
कॅनडाच्या एडमंटन शहरातील भारतीय रहिवासी टीना अँड्र्यूज म्हणाल्या की, आग लागलेल्या दोन घरांपैकी एक घर त्यांचे होते. या भयानक घटनेची माहिती देताना त्यांनी सांगितले की, या घटनेमुळे त्यांना आणि त्यांच्या पतीला अजूनही झोप लागत नाही. ते अजूनही धक्क्यात आहेत. सर्व घरे लाकडाची असतात, लाकडी घरांजवळ फटाके फोडणे योग्य नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.
अजूनही या धक्क्यातून सावरलो नाही
“मी आणि माझे पती या घटनेपासून झोपलेलो नाही. आम्हाला मानसिक धक्का बसला आहे आणि आम्ही अजूनही या धक्क्यातून सावरलो नाही. आणि हो, मी भारतीय आहे, पण आज मला हे सांगायला लाज वाटते. ही आपली संस्कृती नाही, हा शुद्ध निष्काळजीपणा आणि मूर्खपणा आहे”, असे टीना अँड्र्यूज यांनी पोस्टमध्ये लिहिले आहे.

…तर दिवाळी साजरी करण्यात काय अर्थ
“जर तुमच्या फटाक्यांनी दुसऱ्याचे घर जळणार असेल तर दिवाळी साजरी करण्यात काय अर्थ आहे? त्यात आनंद आणि प्रकाश कुठे आहे? जर कोणी जबाबदारीने साजरा करू शकत नसेल, तर कोणताही उत्सव साजरा करू नये”, असेही त्यांनी म्हटले आहे.

फटाक्यांचा दिवाळी उत्सवाशी काहीही संबंध नाही
मोहित विग नावाच्या आणखी एका भारतीयाने यावर भाष्य केले आणि म्हटले की, फटाक्यांचा दिवाळी उत्सवाशी काहीही संबंध नाही. “मी एक भारतीय आहे आणि मला सनातन धर्माचा अभिमान आहे. दिवाळी हा आपला सर्वात महत्त्वाचा सण आहे. पण कृपया मला हे स्पष्ट करण्याची परवानगी द्या की फटाक्यांचा दिवाळी उत्सवाशी काहीही संबंध नाही,” असे त्यांनी म्हटले.
