नवी दिल्ली : दहशतवादी कसाबवर न्याय्य खटला चालवल्यानंतर फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली मग, मला न्याय का दिला जात नाही. मी कसाबपेक्षा खचितच वाईट नाही. मला प्रत्युत्तर देण्याची संधी न देता सक्तवसुली संचालनालयाकडून (ईडी) माहिती प्रसारमाध्यमांना पुरविली जाते, असा आक्रमक बचाव तिहार तुरुंगातील मालीश वादानंतर ‘आप’चे नेते सत्येंद्र जैन यांच्या वतीने मंगळवारी दिल्लीच्या विशेष न्यायालयात केला गेला.
आर्थिक गैरव्यवहाराच्या प्रकरणात सत्येंद्र जैन सहा महिने तिहार तुरुंगात असून तिथे ऐशोराम करत असल्याचा दावा करणारी चित्रफीत प्रसारमाध्यमांनी प्रसारित केल्यामुळे दिल्लीचे मुख्यमंत्री व ‘आप’चे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल अडचणीत आले आहेत. सत्येंद्र जैन तुरुंगात पायांना मालीश करून घेत असल्याच्या चित्रफितीमुळे काँग्रेस व भाजपने ‘आप’वर आरोपांची राळ उठवली आहे. केजरीवाल यांनी तातडीने मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याची मागणी मंगळवारी भाजपने केली. मात्र, त्याकडे पूर्ण दुर्लक्ष करत केजरीवाल यांनी जैन यांची पाठराखण केली आहे.
बलात्काराच्या खटल्यातील आरोपीकडून मसाज?
अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली तिहार तुरुंगात असलेल्या रिंकू नावाच्या गुन्हेगाराकडून जैन यांनी पायाला मालीश करून घेतल्याचा दावा तिहार तुरुंगातील अधिकाऱ्यांनी केला आहे. या प्रकरणावरून वाद निर्माण झाल्यामुळे रिंकूची दुसऱ्या कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. मालीश प्रकरणाने राजकीय वळण घेतले असून जैन यांची मंत्रिपदावरून हकालपट्टी करण्याचे धाडस केजरीवाल का दाखवत नाहीत, असा सवाल भाजपने उपस्थित केला आहे. बलात्काराच्या आरोपाखाली तुरुंगात असलेल्या गुन्हेगारांना ‘आप’ पाठीशी घालत असल्याचा आरोपही भाजपने केला.