हिंदूवर टीका चालते, पण मुस्लिमांवर केल्यास फतवा निघतो – तस्लिमा नसरीन

माझ्याविरोधात फतवा काढण्याऐवजी चर्चा करावी

तस्लिमा नसरीन

हिंदू, बौद्ध किंवा अन्य कोणत्याही धर्मावर टीका केल्यास चालते. पण मुस्लिम धर्मावर टीका केल्यास माझ्याविरोधात फतवा निघतो. कट्टरतावादी संघटना मला ठार मारण्याची धमकी देतात अशी खंत प्रख्यात बांगलादेशी लेखिका तस्लिमा नसरीन यांनी व्यक्त केली.

जयपूरमध्ये सध्या लिटरेचर फेस्टीव्हल सुरु असून यामधील एका चर्चा सत्रात तस्लिमा नसरीन सहभागी झाल्या होत्या. बांगलादेशमध्ये धमक्या येत असल्याने भारतात आश्रय घेणा-या तस्लिमा नसरीन यांनी इस्लामी कट्टरतावादी, समान नागरी कायदा अशा विविध मुद्यांवर भाष्य केले. इस्लामी कट्टरतावाद्यांवर नसरीन म्हणाल्या, जर ती लोक माझ्या मताशी असहमत आहेत. तर त्यांनी माझ्याविरोधात लिहावे, त्यांचे मत जाहीरपणे मांडावे. माझ्याविरोधात फतवा काढण्याऐवजी चर्चा करावी असे त्यांनी सांगितले.

५५ वर्षीय तस्लिमा यांनी मुस्लिम महिलांच्या सद्यस्थितीविषयी मत मांडले. मुस्लिम महिलांवर अत्याचार होत आहे. या महिलांच्या रक्षणासाठी भारतात तात्काळ समान नागरी कायदा लागू करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. हिंदूंसाठी भारतात कायदा आहे. यात हिंदू महिला तिच्या पतीशी घटस्फोट घेतल्यावर पोटगी मागू शकते. हा कायदा किती फायदेशीर आहे हे आता दिसते. मग इस्लामी संघटनांना भारतात समान नागरी कायदा लागू करण्यास आक्षेप काय असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

इस्लामी कट्टरतावाद्यांनी ते धर्मावरील टीका का सहन करु शकत नाही यावर आत्मचिंतन करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. धर्मनिरपेक्षता म्हणजे काय. मुस्लिमांची मत मिळवण्यासाठी इस्लामी कट्टरतावाद्यांना प्रोत्साहन देण्याची गरज आहे का असा सवाल त्यांनी नेत्यांना विचारला आहे.  लोकशाहीमध्ये मुस्लिम महिलांनाही समान हक्क देण्याची गरज आहे. इस्लामी कट्टरतावादी आणि स्त्रीयांचा द्वेष करणा-यांना प्रोत्साहन देणे ही लोकशाही किंवा धर्मनिरपेक्षता नाही. मी कोणत्याही स्वरुपाच्या कट्टरतावाद्यांच्या विरोधात आहे असे त्यांनी आवर्जून नमूद केले.

दरम्यान, जयपूरमध्ये तस्लिमा नसरीन यांच्या निषेधार्थ कार्यक्रम स्थळाच्या बाहेर मुस्लिम संघटनांनी निदर्शनं केली. तस्लिमा यांची बांगलादेशमधून हकालपट्टी करण्यात आली आहे. त्यांना भारतात राहण्याची मुभा दिली आहे. पण त्यांना थोडं जास्तच स्वातंत्र्य मिळत असल्याची टीका या मुस्लिम संघटनांनी केली.  राजस्थान मुस्लिम फोरमच्या शिष्टमंडळाने आयोजकांची भेट घेतली. आयोजकांनी या पुढे जयपूर लिटरेचर फेस्टीव्हलमद्ये सलमान रश्दी आणि तस्लिमा नसरीन या दोघांना आमच्याशी चर्चा केल्याशिवाय बोलवणार नाही असे आश्वासन दिल्याचे फोरमच्या सदस्यांनी सांगितले. तस्लिम नसरीन यांनी यापूर्वीही समान नागरी कायद्याचे समर्थन केले आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: I can criticise hinduism buddhism but not muslims says taslima nasreen