scorecardresearch

‘मला विधिमंत्र्यांशी वाद घालायचा नाही’

भिन्न दृष्टीकोन असण्यात गैर काय? पण, मला अशा मतभेदांना मजबूत घटनात्मक पातळीवर सामोरे जावे लागेल.

cji chandrachud expresses concern over suicides of students
सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड file photo

पीटीआय, नवी दिल्ली : भिन्न दृष्टीकोन असण्यात गैर काय? पण, मला अशा मतभेदांना मजबूत घटनात्मक पातळीवर सामोरे जावे लागेल. विधिमंत्र्यांशी वाद घालायचा नाही, आमच्या दृष्टीकोनांमध्ये मतभेद असणे स्वाभाविक आहे, असे सरन्यायाधीश डॉ. धनंजय चंद्रचूड शनिवारी म्हणाले. प्रत्येक यंत्रणा परिपूर्ण नसते, मात्र आपल्याकडील न्यायवृंद यंत्रणा उत्तम आहे, असे प्रतिपादनही त्यांनी केले. न्यायपालिकेचे स्वातंत्र्य अबाधित राखायचे असेल तर बाह्य प्रभावापासून तिचे संरक्षण केले पाहिजे, असेही सरन्यायाधीश म्हणाले.

प्रत्येक पद्धत परिपूर्ण नसते, मात्र ही उपलब्ध असलेल्या पद्धतींपैकी सर्वोत्तम आहे, असे सांगून न्यायाधीशांच्या नियुक्त्यांसाठी सध्या असलेल्या न्यायवृंद पद्धतीचे सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी  समर्थन केले. न्यायवृंद पद्धत ही सध्या सरकार व न्यायपालिका यांच्यातील वादाचा मुद्दा ठरली आहे. न्यायपालिका स्वतंत्र राहायची असेल तर तिचे बाह्य प्रभावांपासून संरक्षण करणे आवश्यक आहे, असे सरन्यायाधीशांनी ‘इंडिया टुडे कॉन्क्लेव्ह’मध्ये बोलताना सांगितले.  ‘प्रत्येक पद्धत परिपूर्ण नसते, मात्र आपण विकसित केलेली ही सर्वोत्तम पद्धत आहे. मौल्यवान असलेल्या न्यायपालिकेच्या स्वातंत्र्याचे रक्षण करणे हा तिचा उद्देश होता’, असेही चंद्रचूड म्हणाले.

 घटनात्मक न्यायालयांमध्ये नियुक्त्यांसाठी सर्वोच्च न्यायालयाने ज्या नावांची शिफारस केली होती, ती मान्य न करण्यासाठी सरकारने दिलेली कारणे या न्यायालयाने उघड केल्याबद्दल कायदा मंत्री किरेन रिजिजू यांनी नापसंती व्यक्त केली होती, त्यावरही सरन्यायाधीशांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. ‘आकलनात मतभेद असण्यात काय चुकीचे आहे? कायदा मंत्र्यांशी मी वाद घालू इच्छित नाही. आकलनाबाबत आमचे मतभेद असणारच’, असे ते म्हणाले. रिजिजू यांनी न्यायवृंद पद्धतीविरुद्ध उघडपणे आवाज उठवला असून, ही पद्धत ‘आमच्या घटनेसाठी परकीय आहे’, असेही एकदा म्हटले होते.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 19-03-2023 at 00:54 IST