सध्या पंजाब काँग्रेसमधील नाट्यमय राजकीय घडमोडींकडे देशभराचे लक्ष लागलेले आहे. मागील काही दिवसांपासून घडत असलेल्या या घडामोडींमुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चांना उधाण आलेलं आहे. पंजाबाचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग व पंजाब काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू यांच्यातील वादावरून सुरू झालेल्या या घडामोडी, अद्यापही सुरूच आहेत. विशेष म्हणजे आता या दोघांनी देखील राजीनामे दिलेले आहेत. दरम्यान, कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी भेट घेतल्याने, ते भाजपात प्रवेश करतील अशा राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाल्या होत्या. मात्र, आपण भाजपात सामील होणार नसल्याचं अमरिंदर सिंग यांनी स्पष्ट केलं आहे. तसेच, त्यांनी आज राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांची देखील भेट घेतली आहे. या भेटीनंतर त्यांनी माध्यमांनी प्रतिक्रिया देताना, नवज्योतसिंग सिद्धू यांच्यावर पुन्हा एकदा निशाणा साधला.

“मी अगोदरही म्हणालेलो आहे, की नवज्योतसिंग सिद्धू पंजाबसाठी योग्य व्यक्ती नाही. जर तो निवडणूक लढवणार असेल, कुठूनही लढवणार असला तरी मी त्याला जिंकू देणार नाही.” असं विधान पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग यांनी आज माध्यमांसमोर केलं.

तसेच, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागर अजित डोवाल यांची देखील दिल्लीत भेट घेतल्यानंतर त्यांनी माध्यमांशी बोलताना, “आम्ही सुरक्षेसंदर्भातील मुद्द्य्यांवर चर्चा केली. जी इथे सांगता येणार नाही.” अशी प्रतिक्रिया देत, भेटीबाबत विस्तृत माहिती देणं टाळलं.

चंदीगड येथे पोहचल्यानंतर कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी नवज्योतसिंग सिद्धू यांच्यावर जोरदार निशाणा साधला. तसेच, यावेळी त्यांनी हे देखील स्पष्ट केले की, ते आता काँग्रेससोबत राहणार नाहीत आणि भाजपातही प्रवेश करणार नाही. याचबरोबर अमरिंदर सिंग म्हणाले की, जर पक्ष बहुमत गमावत असेल, तर विधानसभा अध्यक्षांनी निर्णय घ्यावा. चन्नी यांचं काम सरकार चालवण आहे. सिद्धू यांचं काम पक्ष चालवण आहे. चन्नी यांच्या कामात सिद्धू यांनी हस्तक्षेप करायला नको.

आपल्या क्षमतांवर काँग्रेस पक्षश्रेष्ठींचा विश्वास नसल्याने आपल्याला अपमानित वाटत आहे, असं कारण देत कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर काँग्रेसने अनुसुचित जातीचे उमेदवार चरणजीत सिंग चन्नी यांना पंजाबचा मुख्यमंत्री म्हणून निवडलं. त्यानंतर काही दिवसांतच नवज्योतसिंग सिद्धू यांनी पंजाब काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिलेला आहे.