पाकिस्तानची पंतप्रधान व्हायचे माझे स्वप्न आहे, अशी भावना किशोरवयीन मानवनाधिकार कार्यकर्ती मलाला युसूफझई हिने व्यक्त केली. पाकिस्तानच्या माजी पंतप्रधान दिवंगत बेनझीर भुट्टो या मलालापुढे आदर्श आहेत. त्यांच्याच पावलांवर पाऊल ठेवत आपल्याला देशसेवा करायची असून, पंतप्रधान व्हायचे असल्याचे मलाला हिने म्हटले आहे.
‘सीएनएन’ला दिलेल्या विशेष मुलाखतीमध्ये मलालाने आपल्या मनातील भावनांना वाट मोकळी करून दिली. गेल्यावर्षी मलालावर तालिबान्यांनी प्राणघातक हल्ला केला होता. या हल्ल्यातून बचावल्यानंतर संपूर्ण जगाचे लक्ष मलालाकडे वेधले गेले. १६ वर्षांची मलाला सध्या अमेरिकेमध्ये आहे.
यंदाच्या शांततेसाठीच्या नोबेल पुरस्कारासाठी मलालाची निवड होण्याची दाट शक्यता व्यक्त करण्यात येते आहे. या पार्श्वभूमीवर मलालाने गेल्यावर्षी तिच्यावर ओढवलेल्या भयानक प्रसंगाबद्दल आणि आपल्या स्वप्नांबद्दल वृत्तवाहिनीला माहिती दिली. तालिबान्यांनी मलालाच्या शाळेच्या बसमध्ये घुसून तिच्या डोक्यामध्ये गोळीबार केला होता. आपल्याला मुला-मुलींच्या शिक्षणाच्या क्षेत्रातही काम करायचे असल्याचे मलालाने यावेळी सांगितले. राजकारणाच्या माध्यमातून देशसेवा करून पंतप्रधान बनण्याची इच्छा असल्याचे मलालाने स्पष्ट केले.