सत्तेतून हकालपट्टी झाल्यानंतर पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी आपण आता अधिक धोकादायक झालो आहोत, असा इशारा दिला आहे. सत्ता हातून गेल्यापासून पहिल्यांदाच इम्रान यांनी पेशावरमध्ये काल सभा घेतली. या सभेत बोलताना इम्रान म्हणाले की, जेव्हा मी सरकारमध्ये होतो, तेव्हा मी धोकादायक नव्हतो, पण आता अधिक धोकादायक झालो आहे.


इंडिया डॉट कॉमने दिलेल्या वृत्तानुसार, विरोधी पक्षांनी अमेरिकेच्या मदतीने कट रचून पाकिस्तानातलं सरकार पाडलं, या गोष्टीचा इम्रान यांनी पुनरुच्चार केला. माजी पंतप्रधान इम्रान खान म्हणाले की ज्यांनी कुणी हा कट शिजवला ते आता आपल्याला सरकारमधून काढल्यानंतर खूश असतील. आयात केलेलं सरकार आम्हाला अमान्य आहे आणि या कृतीविरोधात निषेध व्यक्त करून लोकांनी हे दाखवून दिलेलं आहे.


इम्रान खान यांनी रात्री अपरात्री कोर्टाचं कामकाज सुरू केल्याप्रकरणीसुद्धा भाष्य केलं आहे. इम्रान म्हणाले, मला न्यायालयाला विचारायचं आहे की तुम्ही मध्यरात्री कोर्टाचं कामकाज सुरू केलंत…मला हा देश ४५ वर्षांपासून ओळखतो. मी कधीतरी नियम मोडलाय का? जेव्हा मी क्रिकेट खेळायचो, तेव्हा माझ्यावर मॅच फिक्सिंगचे आरोप कधीतरी झाले आहेत का?


रविवारपासून सुरू झालेल्या सभांबद्दल बोलताना इम्रान खान म्हणाले की, प्रत्येकवेळी जेव्हा पंतप्रधानांना पदावरून पायउतार केलं गेलं, त्यावेळी लोकांनी आनंद साजरा केला. पण जेव्हा मला पदावरून काढण्यात आलं तेव्हा मोठ्या प्रमाणावर निषेध व्यक्त करण्यात आला. इम्रान खान यांना अविश्वासाच्या ठरावाद्वारे पंतप्रधान पदावरून काढण्यात आलं.