बिहार निवडणुकीत एनडीएला २०० हून अधिक जागा मिळाल्या आहेत. बिहारची सत्ता राखण्यात एनडीएला यश आलं आहे. दरम्यान यानंतर राजद अर्थात राष्ट्रीय जनता दलात आणि लालू प्रसाद यादव यांच्या कुटुंबात फूट पडल्याचं पाहण्यास मिळालं आहे. रोहिणी आचार्य यांची घरातून आणि पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. आपल्यावर भाऊ तेजस्वीने चप्पल उगारली होती आणि शिवीगाळ केली असा आरोप करत रोहिणी यांनी खळबळ उडवून दिली. आता मागील तीन दिवसांपासून सुरु असलेल्या या वादावर लालू प्रसाद यादव यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
लालू प्रसाद यादव यांची कन्या रोहिणी काय म्हणाल्या होत्या?
“मला जे सांगायचं ते मी सोशल मीडियावर बोलले आहे. रोहिणी कायमच खरं बोलते. कुणाला काय विचारायचं असेल तर विचारा. माझ्यावर चप्पल उगारली गेली ते मी खरं सांगितलं आहे. संजय यादव, तेजस्वी यादव यांना विचारा काय घडलं. शिवाय रमेशला विचारा. माझे वडील (लालू प्रसाद यादव) आणि माझी आई (राबडी देवी) माझ्या बरोबर आहे. जे काही घडलं त्यामुळे ते दोघंही रडत होते. माझ्या बहिणीही रडत होत्या. देवाचे आभार मानते की मला असे आई वडील मिळाले आहेत ज्यांनी मला कायमच साथ दिली, पाठिंबा दिला. माझं फक्त इतकंच सांगणं आहे की तुमच्या सगळ्यांच्या कुटुंबात माझ्यासारखी बहीण किंवा मुलगी असायला नको. सगळं बलिदान भावांनीच दिलं आहे का? बहिणीने प्रश्न विचारला की सांगतात की तू तुझ्या सासरी निघून जा. तुझं लग्न झालं आहे हे सांगत आहेत. माझे आई वडील, माझ्या बहिणी माझ्या बरोबर आहेत. तेजस्वीशी माझा काही संबंध नाही.” असंही रोहिणी आचार्य यांनी म्हटलं. दरम्यान या प्रकरणी आता लालू प्रसाद यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.
लालू प्रसाद यादव काय म्हणाले?
“आमच्या कुटुंबात जे काही घडलं तो आमचा खासगी आणि कौटुंबिक विषय आहे. मी हा प्रश्न सोडवण्यासाठीच इथे बसलो आहे. तेजस्वीने बिहार निवडणुकीत बरीच मेहनत घेतली.” असं लालू प्रसाद म्हणाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान रोहिणी आचार्य यांनी तेजस्वी यादव यांच्याशी सगळे संबंध तोडल्याचं जाहीर केलं आहे. आता लालू प्रसाद कुटुंब एकत्र आणू शकतात का? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. NDTV ने हे वृत्त दिलं आहे.
बिहार निवडणूक निकालानंतर यादव कुटुंबात काय घडलं?
बिहार निवडणूक निकालात राजदला फक्त २५ जागा मिळाल्या. यानंतर लालू प्रसाद यादव यांच्या घरात भांडण झालं. तेजस्वी यादव आणि रोहिणी आचार्य यांच्यात वाद झाला. “तु्झ्यामुळे आम्ही निवडणूक हरलो आहोत. तुझी हाय लागली आहे आम्हाला.” असं म्हणत तेजस्वी यांनी रोहिणी आचार्य यांना दुषणं दिली आणि त्यांच्या दिशेने चप्पल भिरकावली अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान रोहिणी आचार्य यांनीही चप्पल भिरकावल्याचा उल्लेख माध्यमांशी बोलताना केला आहे. तसंच मला अपमानित करण्यात आलं असंही त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळेच त्यांनी तेजस्वी यादव यांच्याशी काही संबंध नसल्याचं जाहीर केलं आहे. आता या सगळ्या नाराजीनाट्यानंतर लालू प्रसाद यादव घरातली यादवी थांबवण्यात यशस्वी होतील का? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.
