नवी दिल्ली : काही महिन्यांपूर्वी भारतीय प्रशासकीय सेवेत (आय.ए.एस.) पुनर्नियुक्ती झालेल्या शाह फैजल यांनी अनुच्छेद ३७० रद्द करण्यात आल्याविरोधातील आपली सर्वोच्च न्यायालयातील याचिका मागे घेतली आहे.

सनदी सेवेबाहेर पडलेल्या शाह यांना या वर्षी एप्रिलमध्ये पुन्हा या सेवेत घेण्यात आले आहे. त्यांची नियुक्ती सांस्कृतिक खात्यात उपसचिवपदी करण्यात आली आहे. जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारा राज्यघटनेतील अनुच्छेद ३७० रद्द करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतल्यानंतर त्याविरोधात २३ याचिकाकर्ते सर्वोच्च न्यायालयात गेले होते. त्यापैकी शाह फैजल हे एक होते.

बार अ‍ॅण्ड बेंचने यासंबंधात वृत्त दिले आहे. अनुच्छेद ३७० रद्द करण्यात आल्याचा निषेध म्हणून फैजल यांनी सनदी सेवेचा राजीनामा दिला होता. जम्मू-काश्मीरमध्ये वेगळा राजकीय पक्ष स्थापन करण्याची घोषणाही त्यांनी केली होती. परंतु, केंद्र सरकारने त्यांचा राजीमाना स्वीकारला नव्हता. राजीनामा दिला त्यावेळी केलेल्या ट्वीटमध्ये ते म्हणाले होते की, काश्मीरमध्ये केंद्र सरकारकडून शाश्वत असा राजकीय पर्याय पुढे येत नसल्याचा निषेध म्हणून  राजीनामा देत आहे.  काश्मिरी लोकांचे जीव वाचविणे महत्त्वाचे आहे.