सलामीवीर जॉनी बेअरस्टोचं आक्रमक शतक आणि त्याला जेसन रॉय, बेन स्टोक्स आणि जो रुट यांनी दिलेली साथ या जोरावर यजमान इंग्लंडने भारताविरुद्धच्या सामन्यात ३३७ धावांपर्यंत मजल मारली. ३३८ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना रोहित शर्माने दमदार शतक ठोकले. रोहितचे हे या विश्वचषक स्पर्धेतील तिसरे शतक ठरले. दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तान या दोन संघांशी खेळताना रोहितने शतक झळकावले होते. त्यानंतर आता रोहितने इंग्लंडविरुद्ध शतक केले. या कामगिरीसह एका विश्वचषक स्पर्धेत ३ शतके ठोकणारा तो चौथा फलंदाज ठरला . या आधी मार्क वॉ (१९९६), सौरव गांगुली (२००३) आणि मॅथ्यू हेडन (२००७) या तिघांनी ही किमया साधली आहे. रोहितने तिसरे शतक ठोकून दिग्गजांच्या पंगतीत स्थान मिळवले.
Most individual 100s in a #CWC edition
4 – Kumar Sangakkara (2015)
3 – Mark Waugh (1996), Sourav Ganguly (2003), Matt Hayden (2007), Rohit Sharma (2019*)#EngvInd#IndvEng#CWC19#CWC2019
— Mohandas Menon (@mohanstatsman) June 30, 2019
दरम्यान, नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेल्या इंग्लंडने भारतीय गोलंदाजीचा पुरता समाचार घेतला. जेसन रॉय आणि जॉनी बेअरस्टो यांनी पहिल्या विकेटसाठी १६० धावांची भागीदारी केली. दोन्ही फलंदाजांनी भारताच्या फिरकीपटूंवर आक्रमण करत खोऱ्याने धावा ओढल्या. अखेरीस कुलदीप यादवने जेसन रॉयला माघारी धाडत इंग्लंडची जोडी फोडली. बदली खेळाडू रविंद्र जाडेजाने रॉयला सुरेख झेल टिपला. यानंतर बेअरस्टो आणि जो रुट जोडीने पुन्हा एकदा संघाचा डाव सावरला. बेअरस्टोने यादरम्यान आपलं शतकंही साजरं केलं.
Rohit Sharma at #CWC19
122*
57
140
1
18
100*After two low scores, the Hitman is back with a bang, bringing up his third at the competition, off 106 balls
No Indian batsman has ever made more at a single World Cup #ENGvIND | #TeamIndia pic.twitter.com/MkHpoWjq4d
— Cricket World Cup (@cricketworldcup) June 30, 2019
अखेरीस कर्णधार विराट कोहलीने चेंडू मोहम्मद शमीच्या हाती सोपवला. शमीने आपल्या कर्णधाराचा विश्वास सार्थ ठरवत बेअरस्टोला माघारी धाडलं. कर्णधार मॉर्गनही मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात शमीच्या गोलंदाजीवर माघारी परतला. ३०० पल्याड धावसंख्या गाठेल अशी खात्री असलेला इंग्लंडचा संघ अचानक संकटात सापडला. मात्र बेन स्टोक्सने जो रुटच्या साथीने अर्धशतकी भागीदारी रचत संघाचा डाव पुन्हा एकदा सावरला.
पुन्हा एकदा मोहम्मद शमीनेच रुटचा अडथळा दूर करत भारताला आणखी एक यश मिळवून दिलं. मात्र दुसऱ्या बाजूने स्टोक्सने फटकेबाजी सुरु ठेवत इंग्लंडला ३०० धावांचा टप्पा ओलांडून दिला. जोस बटलर आणि ख्रिस वोक्स यांना माघारी धाडत शमीने इंग्लंडला आणखी धक्के दिले. अखेरीस ५० षटकात इंग्लंडला ३३७ धावांपर्यंत रोखण्यात भारत यशस्वी ठरला. भारताकडून मोहम्मद शमीने निम्मा संघ गारद केला. कुलदीप यादव आणि जसप्रीत बुमराहने प्रत्येकी १-१ बळी घेऊन त्याला चांगली साथ दिली.