विश्वचषक स्पर्धेच्या शेवटच्या साखळी सामन्यात भारताने श्रीलंकेवर ७ गडी राखून दणदणीत विजय मिळवला. अनुभवी अँजेलो मॅथ्यूजच्या शतकाच्या बळावर श्रीलंकेने ५० षटकात २६४ धावा केल्या होत्या. २६५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना सलामीवीर लोकेश राहुल (१११) आणि रोहित शर्मा (१०३) यांच्या शतकाच्या जोरावर भारताने सामना ३९ चेंडू राखून जिंकला. उपांत्य फेरीत भारताचा सामना नक्की कोणाशी होणार हे आता ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण अफ्रिका सामन्याच्या विजेत्या संघावर ठरणार आहे.

२६५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना रोहित शर्मा आणि लोकेश राहुल या दोन सलामीवीरांनी दमदार खेळी केली. दोघांनी पहिल्या गड्यासाठी १८९ धावांची भक्कम सलामी दिली. रोहितने स्पर्धेतील पाचवे शतक ठोकले. एकाच स्पर्धेत ५ शतके ठोकणारा तो पहिला फलंदाज ठरला. पण १०३ धावा काढून तो बाद झाला. त्यानंतर लोकेश राहुलने डाव पुढे नेला. त्याने यंदाच्या विश्वचषकातील पहिले शतक ठोकले. पण रोहितप्रमाणेच तो देखील लगेच बाद झाला. १११ धावा काढून त्याला माघारी परतावे लागले. ऋषभ पंतदेखील ४ धावा काढून माघारी गेला. अखेर कर्णधार कोहली (नाबाद ३१) ने भारताला विजय मिळवून दिला.

त्याआधी श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा पर्याय स्वीकारला. पण त्यांची सुरुवात खराब झाली. करुणरत्ने बाद झाल्यावर लगेचच कुशल परेरादेखील १८ धावांवर माघारी गेला. त्यानंतर कुशल मेंडिसदेखील केवळ ३ धावा करून माघारी परतला. जाडेजाने पहिल्याच षटकात त्याचा अडसर दूर केला. तर पुढील षटकात पांड्याने अविष्का फर्नांडोला झेलबाद केले.

अँजेलो मॅथ्यूज आणि थिरिमने या दोघांनी डाव सावरला. या दोघांनीही आपली अर्धशतके पूर्ण केली. पण त्यानंतर थिरिमनेला माघारी परतावे लागले. त्याने ६८ चेंडूत ५३ धावा केल्या. पण मॅथ्यूजने एक बाजू लावून धरली. अनुभवी अँजेलो मॅथ्यूज हा शतक ठोकून बाद झाला. त्याने केलेल्या खेळीमुळे श्रीलंकेला अडीचशे पर्यंत मजल मारता आली. मॅथ्यूजने १२८ चेंडूत १० चौकार आणि २ षटकार लगावत ११३ धावा केल्या. बुमराहने ३ तर पांड्या, भुवनेश्वर कुमार, कुलदीप आणि जाडेजा यांनी १-१ बळी टिपला.

Live Blog

22:39 (IST)06 Jul 2019
राहुल, रोहितची शतकं; भारताकडून ‘लंकादहन’

भारताने श्रीलंकेवर ७ गडी राखून दणदणीत विजय मिळवला. २६५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना सलामीवीर लोकेश राहुल (१११) आणि रोहित शर्मा (१०३) यांच्या शतकाच्या जोरावर भारताने सामना ३९ चेंडू राखून जिंकला.

22:04 (IST)06 Jul 2019
राहुलचे दिमाखदार शतक; भारताचा विजय दृष्टिपथात

राहुलचे दिमाखदार शतक; भारताचा विजय दृष्टिपथात

21:29 (IST)06 Jul 2019
शतकानंतर लगेचच रोहित माघारी; भारताला पहिला धक्का

स्पर्धेतील पाचवे शतक ठोकल्यानंतर रोहित शर्मा माघारी परतला. त्याने ९४ चेंडूत १४ चौकार आणि २ षटकार लगावत १०३ धावा केल्या.

20:50 (IST)06 Jul 2019
लोकेश राहुलचे अर्धशतक; भारत मजबूत स्थितीत

भारताचा दुसरा सलामीवीर लोकेश राहुल यानेही आपले अर्धशतक पूर्ण केले. त्याचबरोबर भारतानेही १५० धावांचा टप्पादेखील गाठला.

20:26 (IST)06 Jul 2019
रोहित शर्माचे दमदार अर्धशतक

चांगली सुरुवात मिलाळाल्यानंतर रोहित शर्माने उत्तम खेळी करत आपले अर्धशतक पूर्ण केले.

19:58 (IST)06 Jul 2019
रोहित-राहुलमुळे भारताची सावध सुरूवात

२६५ धावांच्या आव्हानात्मक लक्ष्याचा पाठलाग करताना सलामीवीर लोकेश राहुल आणि रोहित शर्मा या दोघांनी अत्यंत सावध सुरुवात केली. या दोघांनी भारताला आश्वासक सुरुवात करून दिली.

18:50 (IST)06 Jul 2019
मॅथ्यूजचे दमदार शतक; भारताला २६५ धावांचे आव्हान

अनुभवी अँजेलो मॅथ्यूजचे शतक (११३) आणि थिरिमनेचे अर्धशतक (५३) याच्या जोरावर श्रीलंकेने अडीचशे धावांचा टप्पा गाठला आणि भारताला २६५ धावांचे आव्हान दिले.

18:33 (IST)06 Jul 2019
शतकवीर मॅथ्यूज बाद; श्रीलंकेला सहावा धक्का

अनुभवी खेळाडू अँजेलो मॅथ्यूज हा शतक ठोकून बाद झाला. त्याने केलेल्या खेळीमुळे श्रीलंकेला अडीचशे पर्यंत मजल मारता आली. मॅथ्यूजने १२८ चेंडूत १० चौकार आणि २ षटकार लगावत ११३ धावा केल्या.

18:12 (IST)06 Jul 2019
अँजलो मॅथ्यूजचं शतक, श्रीलंकेची झुंज सुरुच

भारतीय गोलंदाजीचा नेटाने सामना करत मॅथ्यूजने झळकावलं शतक

17:45 (IST)06 Jul 2019
श्रीलंकेची जमलेली जोडी फुटली, थिरीमने माघारी

कुलदीप यादवने घेतला बळी, रविंद्र जाडेजाने घेतला बळी

17:38 (IST)06 Jul 2019
मॅथ्यूजपाठोपाठ लहिरु थिरीमनेचं अर्धशतक

थिरीमने-मॅथ्यूज जोडीची शतकी भागीदारी

17:25 (IST)06 Jul 2019
अँजलो मॅथ्यूजचं अर्धशतक, लंकेचा डाव सावरला

मॅथ्यूज आणि थिरीमने जोडीने पाचव्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी रचत संघाला आश्वासक धावसंख्येचा टप्पा ओलांडून दिला आहे.

15:59 (IST)06 Jul 2019
अविष्का फर्नांडो माघारी, पांड्याने घेतला बळी

श्रीलंकेचा चौथा गडी माघारी. यष्टीरक्षक धोनीने घेतला झेल

15:57 (IST)06 Jul 2019
पहिल्याच षटकात रविंद्र जाडेजाला यश

जाडेजाच्या गोलंदाजीवर पुढे येऊन उंच फटका खेळण्याच्या प्रयत्नात, कुशल मेंडीस यष्टीचीत.

श्रीलंकेचे ३ फलंदाज तंबूत परतले 

15:38 (IST)06 Jul 2019
कुशल पेरेरा माघारी, श्रीलंकेला दुसरा धक्का

बुमराहनेच घेतला बळी, लंकेची खराब सुरुवात. यष्टींमागे धोनीने घेतला झेल

15:19 (IST)06 Jul 2019
श्रीलंकेला पहिला धक्का, कर्णधार दिमुथ करुणरत्ने माघारी

बुमराहच्या गोलंदाजीवर यष्टीरक्षक धोनीकडे झेल देत करुणरत्ने माघारी, जसप्रीत बुमरहाने निर्धाव षटक टाकत घेतला पहिला बळी.

14:45 (IST)06 Jul 2019
भारतीय संघात दोन बदल

मोहम्मद शमी, युजवेंद्र चहलला विश्रांती. कुलदीप यादव-रविंद्र जाडेजाला भारतीय संघात स्थान

14:45 (IST)06 Jul 2019
श्रीलंकेने नाणेफेक जिंकली, प्रथम फलंदाजीचा निर्णय

श्रीलंकेचं स्पर्धेतलं आव्हान संपुष्टात असल्यामुळे सामन्याला केवळ औपचारिकतेचं स्वरुप