|| चंद्रकांत पंडित

बांगलादेशविरुद्ध झालेला सामना भारत जिंकल्यामुळे उपांत्य फेरीत भारताने आपले स्थान पक्के केले आहे. उपांत्य फेरीच्या आधी आपला श्रीलंकेसोबत अजून एक सामना बाकी आहे. त्याआधी संपूर्ण संघाची मांडणी कशा प्रकारे केली पाहिजे आणि कोणत्या रणनीतीने खेळले पाहिजे, याचा परत एकदा भारतीय संघाने विचार करणे गरजेचे आहे. बांगलादेशविरुद्ध झालेल्या सामन्यात रोहित शर्माने शतक झळकावत पुन्हा एकदा आपले सातत्य दाखवले. लोकेश राहुल आणि रोहित यांनी चांगली भागीदारी करून भारताला एक चांगली सुरुवात करून दिली. विराट कोहली या सामन्यात लवकर बाद झाला. ऋषभ पंतने ४८ धावांचे योगदान दिले. महेंद्रसिंह धोनीनेसुद्धा चांगली फलंदाजी केली, परंतु अजूनही भारताला फलंदाजीमध्ये सुधारणा करण्याची गरज आहे. दिनेश कार्तिक, पंत, धोनी, राहुल हे चार यष्टीरक्षक एकाच वेळी एका सामन्यात खेळणे, हे माझ्या कारकीर्दीत मी पहिल्यांदाच बघितले आहे.

विजय शंकरला दुखापतीमुळे विश्वचषकातून माघार घ्यावी लागली. त्याच्याऐवजी संघात दिनेश कार्तिकला या सामन्यात घेण्यात आले. भारताने पाच गोलंदाजांसोबत हा सामना खेळण्याचा प्रयत्न केला, ही गोष्ट पटण्यासारखी नव्हती. केदार जाधवला जर आपण वगळले तर त्याच्या जागी रवींद्र जडेजासारख्या उत्कृष्ट खेळाडूला संघात घेणे, फायद्याचे ठरले असते. जडेजा हा एक उत्तम क्षेत्ररक्षकही आहे. फलंदाजीमध्ये हार्दिक पंडय़ाला पाचव्या क्रमांकावर पाठवले जात असल्याने शेवटच्या षटकांमध्ये जेव्हा संघाला धावा वाढवण्याची गरज असते, तेव्हा तेथे कोणताही खेळाडू खेळपट्टीवर जास्त काळ थांबत नाही. त्यामुळे शेवटच्या षटकांमध्ये जास्त धावा भारताला करता आल्या नाहीत. पंतने बांगलादेशविरुद्ध चांगली फलंदाजी केली. त्यामुळे त्याचा आत्मविश्वास वाढला, परंतु त्याच्या परिपक्वतेपुढील प्रश्नचिन्ह कायम आहे. शेवटची सहा षटके बाकी असताना सामना पुढे घेऊन जाण्याची जबाबदारी त्याच्याकडे होती, तरीही तो बाद झाला. त्या जागेवर संघात जडेजाला स्थान दिले असते तर भारताला पाचवा गोलंदाज आणि शेवटी धावा वाढवण्यासाठी फटकेबाजी करणारा चांगला फलंदाजही मिळाला असता. भारताने बांगलादेशविरुद्ध कमीतकमी ३४०-३५० धावा करणे गरजेचे होते.

उपांत्य फेरीमध्ये कदाचित आपल्याला इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यासारख्या संघासोबत खेळावे लागेल, तेव्हा ३१५-३२५ धावांचा उपयोग येथे होणार नाही. कुलदीप यादवच्या जागी भुवनेश्वर कुमारला घेण्यात आले हा चांगला निर्णय होता. बांगलादेशसोबत झालेल्या सामन्यात आपण केवळ २८ धावांनी जिंकलो. अफगाणिस्तानविरुद्ध झालेला सामनाही अटीतटीचा झाला होता. श्रीलंकेविरुद्ध होणाऱ्या सामन्यात या दोन सामन्यांच्या अनुभवातून धडा घेऊन उत्तम रणनीतीने खेळणे गरजेचे आहे. भारताला त्यानंतर होणाऱ्या उपांत्य फेरीत कोणत्याही संघासोबत खेळावे लागेल, तेव्हा भारताच्या धावफलकावर कमीतकमी ३५० धावा असणे महत्त्वाचे आहे. हेच ध्येय लक्षात ठेवत भारताने चांगले अष्टपैलू खेळाडू संघात खेळवले पाहिजे.

गोलंदाजीमध्ये बुमराने आपली लय कायम ठेवत चांगली कामगिरी केली. त्याचबरोबर बुमरा, भुवनेश्वर, मोहम्मद शमी हे तीन विश्वासू गोलंदाज आपल्या संघात आहेत. त्यांचा हा आत्मविश्वास ते असाच पुढे घेऊन जातील. ३१५ धावांचे लक्ष्य गाठणे तसे कोणत्याही संघाला कठीण नाही, परंतु भारतीय गोलंदाजांनी आपली जबाबदारी चोख बजावल्याने भारताला हा सामना जिंकता आला. नाणेफेक जिंकून भारताने फलंदाजी निवडली. भारताला या खेळपट्टीचा अनुभव होता. त्यामुळे ते सहजच ३५० धावा करू शकत होते, परंतु ३१४ धावांवरच त्यांना समाधान मानावे लागले. शिखर धवनला दुखापत झाली, तेव्हा यष्टीरक्षक-फलंदाज पंतला संघात स्थान देण्यात आले. राहुलला आपण जर पहिल्या स्थानावर खेळवणार होतो, तर चौथ्या क्रमांकावर खेळेल अशा खेळाडूला संघात घेणे गरजेचे होते. अंबाती रायुडू, अजिंक्य रहाणे, सुरेश रैना या अनुभवी खेळाडूंचा विचार निवड समितीने करायला पाहिजे होता. विजय शंकर याच्याऐवजी संघात मयांक अगरवालला घेण्यात आले आहे. तो खेळाडू म्हणून चांगला असला तरी एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांचा त्याला कोणताही अनुभव नाही.

रोहितचा दृढनिश्चय आणि इच्छाशक्ती अविश्वसनीय -श्रीकांत

बर्मिगहॅम : यंदाच्या विश्वचषकात आतापर्यंत चार शतके झळकावणाऱ्या रोहित शर्माचा दृढनिश्चय आणि इच्छाशक्ती अविश्वसनीय असून त्याचा संयम वाखाणण्याजोगा आहे, अशा शब्दांत माजी क्रिकेटपटू कृष्णम्माचारी श्रीकांत यांनी रोहितवर स्तुतिसुमने उधळली आहेत. रोहितने साकारलेल्या कारकीर्दीतील २६व्या शतकाच्या बळावर भारताने मंगळवारी बांगलादेशवर २८ धावांनी मात करून उपांत्य फेरीत धडक मारली. ‘‘सलामीवीराकडून तुम्ही योपेक्षा अधिक अपेक्षा करू शकत नाही. कोणत्या गोलंदाजावर कधी आक्रमण करावे आणि कधी संयमी फलंदाजी करावी, याची रोहितला पूर्ण जाणीव असते. गेल्या काही वर्षांत फलंदाज म्हणून तो फार प्रगल्भ झाला असून त्याच्या खेळातून ते दिसनू येते आहे. त्यामुळेच रोहितचे जितके कौतुक करावे तितके कमी आहे,’’ असे श्रीकांत म्हणाले.