देशात नरेंद्र मोदी हे पुन्हा सत्तेवर आले तर अमित शाह हे देशाचे गृहमंत्री असतील, असा दावा आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी केला आहे. ज्या देशाचा गृहमंत्री अमित शाहसारखा व्यक्ती असेल, त्या देशाची परिस्थिती काय होईल, याचा विचार करुन जनतेने मतदान करावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.

लोकसभा निवडणुकीतील सहाव्या टप्प्यात दिल्लीतील सातही जागांसाठी मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर अरविंद केजरीवाल यांनी ट्विट केले आहे. ट्विटमध्ये केजरीवाल म्हणतात, देशातील नागरिकांनी मतदान करताना फक्त इतकाच विचार करावा की नरेंद्र मोदी पुन्हा सत्तेत आले तर अमित शाहसारखी व्यक्ती गृहमंत्रीपदी विराजमान होईल आणि ज्या देशाचा गृहमंत्री अमित शाहसारखा व्यक्ती असेल त्या देशाची परिस्थिती काय असेल.

दरम्यान, दिल्लीतील सातही जागा जिंकण्याचे भाजपचे उद्दिष्ट आहे. दिल्लीत भाजप, आम आदमी पार्टी आणि काँग्रेस अशी तिरंगी लढत होत असून, त्याचा फायदा भाजपलाच होऊ शकतो. दिल्लीत आघाडी करावी, असा प्रस्ताव आम आदमी पार्टीने काँग्रेसपुढे ठेवला होता, पण दिल्लीतील काँग्रेसनेत्यांनी त्यास नकार दिला होता.