Vladimir Putin Warns Western Countries On Ukraine War: रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी युक्रेनमध्ये पाश्चात्य सैन्य तैनात करण्याचा प्रस्ताव फेटाळून लावला असून, शुक्रवारी इशारा दिला की, अशा प्रकारच्या कोणत्याही सैन्याला “कायदेशीर लक्ष्य” मानले जाईल. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा मॉस्कोमध्ये शांतता चर्चा आयोजित करण्याचा प्रस्ताव दिला आहे.
व्लादिवोस्तोक येथील आर्थिक परिषदेत बोलताना पुतिन यांनी ठामपणे सांगितले की, “जर कोणतेही सैन्य तेथे दिसले, विशेषतः आता लढाई दरम्यान, तर आम्ही या आधारावर पुढे जाऊ की ते कायदेशीर लक्ष्य आहेत.”
युक्रेनमध्ये परदेशी सैन्याची तैनाती हा रशियाच्या राष्ट्रीय सुरक्षेसाठी थेट धोका असल्याचे म्हणत करून, रशियाने सातत्याने युक्रेनमध्ये परदेशी सैन्य तैनात विरोध केला आहे. जर वाटाघाटींमुळे कायमस्वरूपी शांतता निर्माण झाली तर आंतरराष्ट्रीय सैन्य अनावश्यक ठरेल असा युक्तिवाद पुतिन यांनी केला.
पुतिन म्हणाले “जर शांततेकडे, दीर्घकालीन शांततेकडे नेणारे निर्णय घेतले गेले, तर मला युक्रेनच्या भूभागावर परदेशी सैन्याच्या उपस्थितीचा कोणताही अर्थ दिसत नाही. रशिया कोणत्याही कराराचे पूर्णपणे पालन करेल.”
फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी काल युक्रेनच्या २६ मित्र राष्ट्रांनी युद्धबंदी लागू झाल्यानंतर युक्रेनमध्ये परदेशी सैन्य तैनात करण्याचा प्रस्ताव मांडला आहे. शांतता करार झाल्यास जमीन, समुद्र किंवा हवाई मार्गाने तैनात केले जाणारे हे सैन्य युक्रेनची सुरक्षा आणखी भक्कम करेल, असे मॅक्रॉन म्हणाले होते. मॅक्रॉन यांच्या प्रस्तावनंतर पुतिन यांनी यावर आज भाष्य करत इशारा दिला आहे.
मॅक्रॉन यांनी युक्रेनमध्ये सैन्य पाठवणाऱ्यांमध्ये कोणते देश सहभागी होतील हे स्पष्ट केले नाही. परंतु त्यांनी यावर भर दिला की, या सैन्याचा उद्देश थेट रशियन सैन्याशी सामना करणे नाही. “रशियाविरुद्ध युद्ध करण्याची आमची इच्छा किंवा उद्दिष्ट नाही. याचा उद्देश नवीन मोठ्या आक्रमणाला रोखणे आहे”, असे मॅक्रॉन म्हणाले होते.
युक्रेन आणि त्यांच्या मित्र राष्ट्रांमध्ये अनेक आठवड्यांपासून सुरू असलेल्या चर्चेनंतरही युद्धबंदीची शक्यता अजूनही अस्पष्ट आहे. गेल्या महिन्यात अलास्का येथे ट्रम्प आणि पुतिन यांच्यात झालेल्या शिखर परिषदेत प्रगतीची आशा निर्माण झाली होती, परंतु त्यातून यामध्ये फारशी काही प्रगती झालेली नाही.