यासीन भटकळ या दहशतवाद्याच्या सुटकेसाठी इंडियन मुजाहिदीन ही दहशतवादी संघटना दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अपहरणाचा कट आखत असल्याची खात्रीलायक माहिती दिल्ली पोलिसांना मिळाली आहे. या पाश्र्वभूमीवर केजरीवाल यांना झेड दर्जाची सुरक्षा बहाल करण्यात येणार आहे.
गेल्या वर्षी २७ ऑगस्ट रोजी यासीनला नेपाळ सीमेवरून अटक करण्यात आली. यासीनच्या अटकेमुळे इंडियन मुजाहिदीनच्या कारवायांना चाप बसला आहे. त्यामुळे अस्वस्थ असलेल्या मुजाहिदीनने थेट केजरीवाल यांच्याच अपहरणाचा कट आखण्यास सुरुवात केली असल्याची खात्रीलायक माहिती दिल्ली पोलिसांच्या हाती लागली आहे. या पाश्र्वभूमीवर केजरीवाल यांना झेड दर्जाची सुरक्षा व्यवस्था पुरवली जाणार असल्याचे दिल्ली पोलिसांनी स्पष्ट केले. विशेष म्हणजे मुख्यमंत्रिपदी विराजमान झाल्यापासून केजरीवाल यांनी सुरक्षा व्यवस्था नाकारली आहे. आम आदमी पक्षाने निवडणुकीदरम्यान दिल्लीतील व्हीआयपी संस्कृती नष्ट करण्याचे आश्वासन मतदारांना दिले असल्याने केजरीवाल सुरक्षा व्यवस्था नाकारत आहेत. मात्र, आता त्यांच्या जिवाला धोका असल्याचे पाहता केजरीवाल सुरक्षा व्यवस्थेचा स्वीकार करतील अशी दिल्ली पोलिसांना अपेक्षा आहे.

‘आप’च्या तिकिटावर लोकसभेची निवडणूक लढविण्याचा मार्ग मला मोकळा आहेच़, पण नर्मदा बचाव आंदोलनातील काही नेतेही ‘आप’च्या तिकिटावर मध्य प्रदेशातील किमान दहा जागांवर येत्या लोकसभेची निवडणूक लढविण्याचा विचार करत आहेत़  ‘नॅशनल एलायन्स ऑफ पीपल्स मूव्हमेंट’ने ‘आप’ला पूर्ण पाठिंबा दिलाच आह़े  
– मेधा पाटकर, ज्येष्ठ समाजसेविका़