करोनामुळे संपूर्ण जगाचं अर्थचक्र थांबलं आहे. एका देशात करोनाची लाट ओसरल्यावर दुसऱ्या देशात करोनाची लाट येत असल्याचं चित्र आहे. त्यामुळे उद्योग, व्यापार, पर्यटन अशा सर्व बाबींवर परिणाम झाला आहे. यामुळे प्रत्येक देश चिंतेत आहे. हा करोनारुपी राक्षस कधी नष्ट करण्यासाठी योजना आखल्या जात आहेत. मात्र अपुऱ्या आरोग्य यंत्रणेमुळे हे शक्य होत नाही. आतापर्यंत जगात ३.५ दशलक्ष लोकांचा करोनामुळे जीव गेला आहे. २०२२ मध्ये ही स्थिती आणखी चिंताजनक होईल अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. त्याासाठी मोठ्या प्रमाणात लसीकरणाची मागणी जोर धरत आहे. आता आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं याबाबत काही सूचना केल्या आहेत. वर्षाअखेरीस जगातील जवळपास ४० टक्के लोकांचं लसीकरण आणि २०२२ या वर्षाच्या सुरुवातीला ६० टक्के लोकांचं लसीकरण होणं गरजेचं आहे. यासाठी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने ५० अब्ज डॉलर्सचा प्रस्ताव ठेवला आहे.

आतापर्यंत अनेक देशात लोकसंख्येच्या केवळ १ टक्के लोकांचं लसीकरण झालं आहे. त्यामुळे लसीकरणावर आर्थिक असमानतेचा मोठा प्रभाव दिसत आहे. जिथपर्यंत लसीकरण मोहीम वेगाने वाढत नाही तोपर्यंत करोनारुपी राक्षस नष्ट होणं कठीण आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय नाणे निधीनंं ५० अब्ज डॉलर्सची योजना आखत करोना आटोक्यात आणण्यासाठी प्रस्ताव ठेवला आहे. यापैकी ३५ अब्ज डॉलर्स श्रीमंत देश आणि खासगी देणगीदारांकडून जमा केले जातील. तर उर्वरित १५ अब्ज डॉलर्स रक्कम विविध देशातील सरकारडून जमा करण्याचा प्रस्ताव आहे.

करोना स्थिती लवकर निवळली तर २०२५ पर्यंत अर्थव्यवस्थेत ९ ट्रिलियन डॉलर्सची भर पडेल. त्याचा विकसित देशांना सर्वाधिक फायदा होईल असं आंतराष्ट्रीय नाणेनिधी अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.