Election Commission : लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी मागील काही दिवसांपासून केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कार्यशैलीवर टीका करत आहेत. मतदान प्रक्रियेत अनियमितता झाल्याचा आरोप राहुल गांधी करत आहेत. या संदर्भात काही दिवसांपूर्वी राहुल गांधींनी एक पत्रकार परिषद घेत काही पुराव्यांचं सादरीकरण केलं होतं. राहुल गांधींनी केलेल्या आरोपानंतर देशभरात एकच खळबळ उडाली होती. दरम्यान, राहुल गांधींच्या आरोपानंतर निवडणूक आयोगाने १७ ऑगस्ट रोजी पत्रकार परिषद घेत आरोपांना उत्तर देत सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.
तसेच राहुल गांधींच्या मत चोरीच्या आरोपांना निवडणूक आयोगाने काही नेते मतदारांची दिशाभूल करत असल्याचं म्हटलं. मात्र, निवडणूक आयोग अशा खोट्या आरोपांना घाबरत नाही. तसेच मतचोरी सारख्या चुकीच्या शब्दाचा वापर करण्यात आल्यामुळे हा भारतीय संविधानाचा अपमान असल्याचं मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी म्हटलं. तसेच राहुल गांधी यांनी मत चोरीच्या आरोपांबाबत सात दिवसांत शपथपत्र सादर करावं किंवा देशाची माफी मागावी असा इशारा निवडणूक आयोगाने दिला.
निवडणूक आयोगाने केलेल्या या टिकेनंतर आता विरोधक चांगलेच आक्रमक झाल्याचं बोललं जात आहे. कारण इंडिया आघाडीचे नेते मुख्य निवडणूक आयुक्तांच्या विरोधात महाभियोगाचा प्रस्ताव मांडण्याच्या विचारात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, राज्यसभेतील खासदार आणि काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विरोधी पक्षाच्या नेत्यांच्या बैठकीत या विषयावर चर्चा झाल्याचं बोललं जात आहे. या संदर्भातील वृत्त इंडियन एक्स्प्रेसने दिलं आहे.
काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे हे म्हणाले की, “भारतीय निवडणूक आयोग आपले संविधानिक कर्तव्य सोडून राजकीय पक्षांच्या खऱ्या प्रश्नांना टाळू शकत नाही. मतदानाचा अधिकार हा भारतीय संविधानाने आपल्याला दिलेला सर्वात महत्त्वाचा अधिकार आहे. लोकशाहीची गळचेपी करण्याच्या कोणत्याही प्रयत्नाचा भारत निषेध करेल.”
तसेच विरोधी पक्ष नेत्यांच्या पत्रकार परिषदेत राजदचे नेते मनोज कुमार झा यांनी म्हटलं की, “आमच्यासमोर सर्व संसदीय आणि कायदेशीर पर्याय खुले आहेत.” दरम्यान, महाभियोगाच्या सूचनेची शक्यतेनंतर भाजपाकडून तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे. सत्ताधारी पक्षाने विरोधी पक्षाच्या हेतूवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. दरम्यान, या घडामोडींवरून आता सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये राजकारण तापण्याची शक्यता आहे.
राहुल गांधींच्या आरोपांना उत्तर देताना आयोगाने काय म्हटलं?
“जेव्हा निवडणूक आयोगाच्या खांद्यावर बंदूक ठेवून भारताच्या मतदारांना लक्ष्य करत राजकारण केले जाते, अशावेळी निवडणूक आयोग प्रत्येकाला स्पष्ट करू इच्छितो की निवडणूक आयोग गरीब, श्रीमंत, वृद्ध, महिला, तरुण यासह सर्व स्तरातील, सर्व धर्माच्या सर्व मतदारांबरोबर कोणताही भेदभाव न करता खंबीरपणे उभा आहे.” पुढे बोलताना त्यांनी राहुल गांधी यांनी केलेली वक्तव्य ही संविधानाचा अपमान असल्याचे म्हटले आहे, तसेच मत चोरी यासरखे शब्द हे लोकशाही संस्थांना कमकुवत करतात असेही निवडणुक आयुक्त म्हणाले.