नवी दिल्ली : राज्यसभेतील जुलैपर्यंत निवृत्त होणाऱ्या ७२ सदस्यांना गुरुवारी भावनिक निरोप देण्यात आला. ‘ज्ञानापेक्षा अनुभवामध्ये समस्येचे निराकरण करण्याची अधिक ताकद असते. वरिष्ठ सभागृहाच्या चार भिंतीआड मिळवलेला अनुभव देशाच्या कानाकोपऱ्यात घेऊन जा’, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सहा वर्षांचा कार्यकाळ संपवून राजकारणातील नवे पर्व सुरू करणाऱ्या सदस्यांना केले.

मोदींच्या भाषणानंतर झालेले विरोधीपक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांचे भाषण मात्र अप्रत्यक्षपणे मोदींना उपदेश करणारे ठरले. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ए. के. अ‍ॅण्टनी निवृत्त होत असून त्यांचा उल्लेख करून खरगे म्हणाले, ‘अ‍ॅण्टनी अत्यंत कमी बोलतात. त्यांचे भाषण कमी आणि काम जास्त असते. काहींना मात्र सतत बोलण्याची सवय असते’.. खरगे यांनी माजी पंतप्रधान पं. नेहरू, अटलबिहारी वाजपेयी यांचाही उल्लेख केला. ‘सत्ताधाऱ्यांनी विरोधी पक्षांचे साह्य घेतले तर लोकांच्या कल्याणाचे निर्णय घेता येतात, विरोधकांची संख्या कमी असते, पण त्यांच्या तर्कामध्ये अधिक बळ असते, असे वाजपेयी म्हणाले होते. आता मात्र तर्कापेक्षा सत्ताधाऱ्यांच्या ‘सुरां’ना अधिक महत्त्व आले आहे’, असा टोला खरगेंनी लगावला.

‘राज्यसभा हे दुय्यम दर्जाचे सभागृह असल्याचा गैरसमज पसरवण्यात आला आहे. लोकसभेत घाईघाईत आणलेली विधेयके रोखण्यासाठी वरिष्ठ सभागृह अत्यंत महत्त्वाचे असल्याचे माजी राष्ट्रपती राधाकृष्णन म्हणाले होते’, अशी आठवणही खरगेंनी करून दिली. खरगेंच्या भाषणावर दुपारच्या सत्रात सभागृहाचे उपनेते मुख्तार अब्बास नक्वी यांनी नाराजी व्यक्त केली. ‘‘काँग्रेसच्या काळात तत्कालीन पंतप्रधानांना त्यांच्या पक्षाचे मुख्यमंत्रीदेखील भेटू शकत नसत. आता मोदी सर्वाना वेळ देतात, संसदेत ते सगळय़ांना भेटतात. खरगेंनी मोदींवर टीका करणे योग्य नाही’’, असे नक्वी म्हणाले.

काँग्रेसचे जयराम रमेश, आनंद शर्मा, सुब्रह्मण्यन स्वामी आदी दोन दशकांहून अधिक काळ वरिष्ठ सभागृहाचा अनुभव असलेले ज्येष्ठ सदस्य निवृत्त होत आहेत. त्यांच्या योगदानाबद्दल अनेक सदस्यांनी मनापासून आभार मानले. निवृत्त होत असलेले संभाजी छत्रपती, नरेंद्र जाधव, अभ्यासू खासदार सुरेश प्रभू यांचाही ‘द्रमुक’चे टी. शिवा,‘बीजेडी’चे प्रसन्न आचार्य आदींनी आवर्जुन उल्लेख केला. ‘‘इतक्या प्रचंड संख्येने अनुभवी सदस्य एकाचवेळी निवृत्त झालेले मी २८ वर्षांत पहिल्यांदाच पाहात आहे’, असे समाजवादी पक्षाचे रामगोपाल यादव म्हणाले. हाच मुद्दा सुरुवातीला सभापती व्यंकय्या नायडू यांनी मांडला. हिमाचल प्रदेशमधून १९८४ मध्ये पहिल्यांदा राज्यसभेवर निवडून आलेले आनंद शर्मा म्हणाले की, देवाचा रथदेखील एका चाकावर चालत नाही, मग लोकशाहीसारखी संस्था केवळ सत्ताधारी पक्षाच्या ताकदीवर कशी चालेल? विरोधकांचे चाकही बळकट झाले पाहिजे, त्यासाठी काँग्रेससारखा राष्ट्रीय पक्षही मजबूत झाला पाहिजे. अलीकडे राजकीय विरोधकांना शत्रू मानले जाते, कटुता निर्माण केली जाते, पण सत्ताधाऱ्यांसाठी अजूनही वेळ गेलेली नाही. त्यांना ही चूक सुधारता येऊ शकेल.