Imran Khan accusing Asim Munir for inflicting oppression : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी पाकिस्तनाचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. इम्रान खान म्हणाले की “मुनीर हे पाकिस्तानी जनतेवर अत्याचार करत आहेत. अत्याचार करून ते सगळं काही नियंत्रणात ठेवू पाहत आहेत जेणेकरून ते दीर्घकाळ त्यांची सत्ता टिकवू शकतील आणि त्यांची राजवट चालवू शकतील. यावेळी पाकिस्तानात अघोषित मार्शल लॉ लागू करण्यात आला आहे.”

पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू आणि माजी पंतप्रधान इम्रान खान हे सध्या तुरुंगात आहेत. जेलमधूनच त्यांनी एक निवेदन प्रसिद्ध केलं आहे ज्यात त्यांनी असीम मुनीर यांच्यावर टीका केली आहे. ते म्हणाले, “२०२४ च्या निवडणुकीत हेराफेरी करून शाहबाज शरीफ यांचं सरकार स्थापन करण्यात आलं. आता असीम मुनीर यांच्या इशाऱ्यांवर सरकार शरीफ यांच्याच कार्यकर्त्यांवर अत्याचार करत आहे.”

इम्रान खान काय म्हणाले?

इम्रान खान यांनी एक्सवर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं आहे की “असीम मुनीर हे त्यांची त्यांची राजवट टिकवून ठेण्यासाठी पाकिस्तानच्या जनतेवर अन्याय करत आहेत, त्यामुळे देश कमकुवत होत आहे. ज्यांनी (मुनीर अँड कंपनीने) जनादेश चोरला आहे ते आता काहीसे घाबरले आहेत. याच भीतीमुळे आमच्यावरील अत्याचार वाढत आहेत.”

माझं मानसिक खच्चीकरण करण्याचा प्रयत्न होतोय : इम्रान खान

“मला आणि माझी पत्नी बुशरा बीबी यांना ‘एकांत कारावासात’ ठेवून हे लोक माझं मानसिक खच्चीकरण करू पाहत आहेत. मी कोलमडून पडावं असं त्यांना वाटतं. मी माझे विचार सोडावे आणि जनतेचा आवाज दबला जावा असं त्यांना वाटतं.”

इम्रान खान यांच्याकडून असीम मुनीर यांची याह्या खान यांच्याशी तुलना

इम्रान खान यांनी आपल्या पोस्टमध्ये पाकिस्तानमधील सध्याच्या स्थितीची १९७१ मधील याह्या खान यांच्या काळातील स्थितीशी तुलना केली आहे. तेव्हा गृहयुद्धानंतर पूर्व पाकिस्तान वेगळा होऊन नव्या बांगलादेशचा जन्म झाला होता. इम्रान खान म्हणाले, “१९७१ आणि आजच्या काळात एकच फरक आहे की आता लोक अधिक जागरुक झाले आहेत. समाजमाध्यमांमुळे लोकांपर्यंत थोडंफार सत्य पोहोचत आहेत. समाजमाध्यमांमुळे तथ्ये लोकांपर्यंत पोहोचत आहेत. तसेच लोक अन्यायाविरोधात कसं लढायचं ते शिकले आहेत. त्यामुळे मला आशा आहे की पाकिस्तानची जनता दडपशाही करणारी व्यवस्था संपुष्टात आणेल.”