पीटीआय, लाहोर : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना अटक करण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी गेलेल्या पोलिसांना रिकाम्या हाती परत जावे लागले. इम्रान खान घरी नव्हते, मात्र ते मंगळवारी न्यायालयासमोर हजर राहतील असे त्यांच्या वकिलांनी पोलिसांना सांगितले. आम्ही इम्रान यांच्या खोलीतही शोध घेतला असे पोलिसांकडून सांगण्यात आले.

दरम्यान, इस्लामाबाद न्यायालयाने इम्रान यांना अटक करण्याचे आदेश दिलेले नसून त्यांना ७ मार्चपर्यंत न्यायालयासमोर हजर राहण्यास सांगण्यात आलेले आहे, असा युक्तिवाद पाकिस्तान तेहरिक-ए-इन्साफचे उपाध्यक्ष आणि माजी परराष्ट्रमंत्री शाह महमूद कुरेशी यांनी केला. तोशाखाना प्रकरणात न्यायालयाने बिगर-जामीन अटक वॉरंट जारी केल्यामुळे त्यांना अटक होण्याची शक्यता आहे.  इम्रान खान यांनी तीन वेळा सुनावणीसाठी न्यायालयात हजर राहणे टाळले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

काय आहे तोशाखाना प्रकरण ?

इम्रान खान यांनी पंतप्रधान पदावर असताना त्यांना मिळालेल्या भेटवस्तूंची माहिती उघड न केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. पाकिस्तानात सरकारी अधिकारी तसेच लोकप्रतिनिधी, मंत्री इत्यादींना परदेशातून मिळालेल्या भेटवस्तू जमा कराव्या लागतात. त्या विभागाला तोशाखाना असे म्हणतात. इम्रान खान यांनी २०१८ साली सत्तेवर आल्यावर यासंबंधीचा निर्णय बदलला आणि तोशाखानात जमा केलेल्या काही भेटवस्तू अल्प किंमत मोजून परत घेतल्या आणि त्या विकल्या, असा आरोप आहे.