पाकिस्तानात नव्याने निवडून आलेल्या इम्रान खान यांच्या सरकारने पैशांची उधळपट्टी रोखण्यासंदर्भात काही महत्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. पंतप्रधान इम्रान खान यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत अधिकारी, नेते आणि घटनात्मक पदांवरील व्यक्तिंना फर्स्ट क्लासमधून हवाई प्रवास करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. या निर्णयानुसार यापुढे पाकिस्तानात, सरकारी अधिकारी, राष्ट्राध्यक्ष, मुख्य न्यायमूर्ती, पंतप्रधान आणि सिनेट चेअरमन यांना फर्स्ट क्लास दर्जाचा हवाई प्रवास करता येणार नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मंत्री फवाद चौधरी यांनी ही माहिती दिली. आठवडयाभरात झालेल्या दुसऱ्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. आठवडयातील रविवारच सुट्टी कायम ठेऊन शनिवारची सुट्टी रद्द करण्याचा प्रस्ताव मंत्रिमंडळाने फेटाळून लावला. वीजेची कमतरता आणि इंधन वाचवण्यासाठी पाकिस्तानात २०११ साली सरकारी कर्मचाऱ्यांना पाच दिवसांचा आठवडा करण्यात आला होता.

सरकारी नोकरीची आठ तासाची वेळ कायम ठेवण्यात आली आहे. फक्त आता नऊ ते पाच अशी वेळ करण्यात आली आहे. यापूर्वी सरकारी कामकाजाची वेळ आठ ते चार होती. परदेश दौरे तसेच देशांतर्गत प्रवासासाठी विशेष विमान न वापरण्याचा निर्णय इम्रान खान यांनी घेतला आहे. पंतप्रधान म्हणून काम करताना ते फक्त दोन गाडया आणि दोन नोकर सेवेसाठी ठेवणार आहेत. आधीच्या सरकारने पंजाब आणि खैबर पख्तूनखवा प्रांतात सुरु केलेल्या सर्व मोठया प्रकल्पांचे ऑडीट करण्याचा महत्वाचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Imran khan govt in pakistan ban first class travel
First published on: 25-08-2018 at 16:41 IST