पीटीआय, इस्लामाबाद, लाहोर : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना शनिवारी इस्लामाबाद अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायालयाने आवारातूनच परत जाण्याची परवानगी दिली. त्यानंतर न्यायालयाने तोशाखाना प्रकरणात खान यांच्याविरुद्धचे अटक वॉरंटही रद्द केल्याचे वृत्त आहे.  न्यायालयाच्या आवाराबाहेर इम्रान खान यांच्या समर्थकांची मोठी गर्दी झाली होती, यापूर्वीच्या सुनावणींना वारंवार गैरहजर राहिल्यामुळे त्यांना अटक करण्याचा प्रयत्न करणारे पोलीस आणि समर्थक यांच्यात संघर्ष झाला. त्यानंतर न्यायालयाने इम्रान यांची सही न घेता हजेरी नोंदवली आणि त्यांच्यावर दोषारोप न ठेवताच न्यायालयाने त्यांना परत जाण्यास परवानगी दिली.

शनिवारी लाहोर आणि इस्लामाबादमध्ये बऱ्याच नाटय़मय घडामोडी घडल्या. इम्रान खान इस्लामाबाद अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायालयात हजर राहण्यासाठी लाहोरहून आले, त्यावेळी त्यांच्याबरोबर मोठय़ा संख्येने समर्थकही होते. तसेच न्यायालयाच्या आवारात सुरक्षेसाठी मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. गर्दीमुळे इम्रान यांना न्यायालयात प्रवेश करता आला नाही. यावेळी इम्रान खान यांचे समर्थक आणि पोलिसांमध्ये संघर्ष झाला. समर्थकांनी पोलिसांवर दगडफेक, तसेच जाळपोळ केली असे पोलिसांचे म्हणणे आहे.  

दुसरीकडे, न्यायालयाचे कामकाज सुरू झाल्यानंतर न्यायाधीशांना इम्रान खान यांची अनेक तास प्रतीक्षा करावी लागली. मात्र, समर्थकांची गर्दी आणि हाताबाहेर जाणारी परिस्थिती पाहता न्यायाधीशांना इम्रान खान यांना परत पाठवण्याचा निर्णय घेतला. येथील परिस्थिती पाहता सुनावणी आणि हजेरी पूर्ण करता येणे शक्य नाही असे निरीक्षण न्यायाधीशांनी नोंदवले. जमलेल्या सर्वानी परत जावे आणि दगडफेक, तसेच गोळीबार करू नये असे निर्देश न्यायालयाने दिले. हजेरीवर इम्रान खान यांची सही झाल्यांतर पुढील सुनावणी कधी घ्यायची याची तारीख दिली जाईल असे न्यायाधीशांनी सांगितले. इम्रान खान यांनी शुक्रवारी लाहोर उच्च न्यायालयात हजर राहून शनिवारी इस्लामाबाद न्यायालयात हजर राहण्याची हमी दिली होती. पंतप्रधान असताना इम्रान यांना मिळालेल्या भेटवस्तू त्यांनी तोशाखान्यातून स्वस्तात विकत घेतल्या आणि नंतर जास्त किमतीला विकल्या असा आरोप आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पोलीस-कार्यकर्ते संघर्ष

इम्रान खान यांनी लाहोर सोडल्यानंतर १० हजारांपेक्षा जास्त पंजाब पोलिसांनी जमावबंदी लागू करून त्यांच्या निवासस्थानी कारवाई केली. यावेळी त्यांच्या ६१ समर्थकांना अटक केली. या कारवाईत रायफलसह इतर शस्त्रास्त्रे आणि पेट्रोल बॉम्ब जप्त केल्याचा दावा पोलिसांनी केला. समर्थकांनी इम्रान यांच्या निवासस्थानाबाहेर उभारलेल्या अनेक छावण्या, बॅरिकेड पोलिसांनी हटवले. यावेळी झालेल्या संघर्षांत १० पोलीस आणि कार्यकर्ते जखमी झाले.