South Africa सध्या दक्षिण आफ्रिकेत दुष्काळामुळे भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असून त्याची झळ आता केपटाऊनमध्ये Cape Town दाखल झालेल्या भारतीय संघाच्या खेळाडूंनाही सहन करावी लागत आहे. आंघोळीच्यावेळी दोन मिनिटांपेक्षा जास्त काळ शॉवर घेऊ नये, असे भारतीय खेळाडूंना हॉटेल प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. केपटाऊनमधील पाणी टंचाईमुळे हॉटेल प्रशासनाने पाणी वाचवण्यासाठी काही नियम जारी केले आहेत. हे नियम अगदीच बंधनकारक नसले तरी हॉटेल प्रशासन त्यासाठी आग्रही आहे. केपटाऊनमधील तप्त वातावरणात सराव केल्यानंतर भारतीय खेळाडू पुन्हा हॉटेलवर परतले तेव्हा त्यांना याबद्दल सांगण्यात आले. अनेक भारतीय खेळाडू हे दुष्काळग्रस्त परिसरातील असल्यामुळे त्यांना पाणी टंचाईच्या समस्येची जाण आहे. मात्र, केपटाऊनमध्ये दाखल झाल्यानंतर अचानक उद्भवलेल्या या समस्येशी अजून भारतीय खेळाडूंना नीटसे जुळवून घेता आलेले नाही. तरीही भारतीय खेळाडू आपापल्या परीने दोन मिनिटांत आंघोळ आटोपण्याचा प्रयत्न करत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सध्या दक्षिण आफ्रिकेतील बहुतांश महत्वाच्या शहरांना दुष्काळ आणि पाणी टंचाईने ग्रासले आहे. त्यामुळे केप टाऊनच्या स्थानिक प्रशासनाने सर्व नागरिकांना एका दिवसाला ८७ लिटरच्या वर पाणी वापरण्यास मनाई केली आहे. त्यामुळे केप टाऊनच्या मैदानावर उसळती खेळपट्टी तयार करण्यातही आफ्रिकन क्युरेटर्सना अडचणी आल्या होत्या. केप टाऊनच्या मैदानावर बोअरवेलच्या पाण्याची सोय आहे. मात्र, केप टाऊनच्या मैदानाचे क्युरेटर इवन फ्लिंट यांनी पहिल्या कसोटीत खेळपट्टी ही आफ्रिकेन संघाला फायदेशीर ठरेल याची खात्री देता येणार नाही, असे म्हटले होते.

दक्षिण आफ्रिकेतला दुष्काळ भारतीय संघाच्या पथ्यावर?

फ्लिंट यांनी दिलेल्या माहितीनुसार, पाणीटंचाईमुळे आठवड्यातून केवळ दोन वेळाच मैदानाला पाणी देणए शक्य आहे. त्यामुळे केपटाऊनच्या खेळपट्टीवर जलद गोलंदाजीसाठी आवश्यक असलेली हिरवळ राहिल, याची खात्री देता येणार नाही असे फ्लिंट यांनी म्हटले होते. आगामी काही दिवसांमध्ये सकाळी पावसाची हलकी सर पडून नंतर प्रखर ऊन पडल्यास आम्ही कदाचित नेहमीप्रमाणे खेळपट्टी तयार करु. मात्र, या सर्व गोष्टी आपल्या हातात नसल्याचंही फ्लिंट यांनी मान्य केलं. यामुळे आफ्रिकेच्या जलद गोलंदाजीची धार कमी होऊ शकते. ही बाब भारतीय संघाच्या पथ्यावर पडण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In dry cape town indian cricket team told not more than two minutes in shower
First published on: 04-01-2018 at 09:34 IST