सध्या देशात २०२४ च्या लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. या पार्श्वभूमीवर सत्ताधारी भाजपासह विरोधी पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. अलीकडेच विरोधी पक्षाने आपल्या आघाडीचं नामकरण ‘इंडिया’ असं केलं होतं. यानंतर देशात ‘भारत’ विरुद्ध ‘इंडिया’ असा वाद सुरू झाला. काही दिवसांपूर्वी भारतात पार पडलेल्या जी-२० शिखर परिषदेच्या आमंत्रण पत्रिकेतही ‘प्रेसिडेंट ऑफ इंडिया’ ऐवजी ‘प्रेसिडेंट ऑफ भारत’ असा उल्लेख करण्यात आला होता. यानंतर सर्वांच्या भुवया उंचावल्या होत्या.
या सर्व घडामोडींनतर आता नॅशनल काऊन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंगच्या (NCERT) पॅनेलने यापुढे छापण्यात येणाऱ्या पाठ्यपुस्तकांमध्ये ‘इंडिया’ ऐवजी ‘भारत’ असा शब्द छापण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतचा प्रस्ताव एनसीईआरटीच्या सर्व सदस्यांनी एकमताने स्वीकारला आहे.
या पॅनेलमधील एक सदस्य CI Issac यांनी ‘इंडिया टुडे’ला सांगितलं की, नवीन NCERT पुस्तकांमध्ये ‘इंडिया’ ऐवजी ‘भारत’ असा उल्लेख केला जाईल. हा प्रस्ताव काही महिन्यांपूर्वी मांडण्यात आला होता. तो प्रस्ताव आता पॅनेलमधील सर्व सदस्यांनी एकमताने स्वीकारला आहे. देशाचं नाव ‘भारत’ असं ठेवणार असल्याच्या चर्चेदरम्यान NCERT पॅनेलने याबाबतची शिफारस केली होती.
हेही वाचा- लालकिल्ला: आता ‘इंडिया’चे काय होणार?
याशिवाय, सप्टेंबर महिन्यात दिल्लीच्या प्रगती मैदानात पार पडलेल्या G20 नेत्यांच्या शिखर परिषदेला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या टेबलवरील नेमप्लेटवर ‘प्राईम मिनिस्टर ऑफ भारत’ असा उल्लेख करण्यात आला होता. विशेष म्हणजे घटनेच्या कलम १(१) मध्ये आपल्या देशाचे नाव ‘इंडिया’ म्हणजेच भारत हा राज्यांचा संघ असेल अशी व्याख्या केली आहे.
NCERT पॅनेलच्या इतर शिफारसी
याव्यतिरिक्त, NCERT पॅनेलने पाठ्यपुस्तकांमध्ये हिंदू विजयांना (Hindu victories) अधिक महत्त्व देण्याची शिफारसही केली आहे. तसेच पाठ्यपुस्तकांमध्ये ‘एन्शियंट हिस्ट्री’ऐवजी ‘क्लासिकल हिस्ट्री’ समाविष्ट करण्याची शिफारसही केली आहे. तसेच वैज्ञानिक प्रगती आणि ज्ञानाबाबत भारताला कमी लेखणाऱ्या ब्रिटिशांच्या इतिहासाची यापुढे प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक अशी विभागणी केली जाणार नाही, असंही Issac म्हणाले.
