वाढीव लसमूल्याचे ‘सीरम’कडून समर्थन

लशीच्या जागतिक किमतीची भारतातील किमतीशी चुकीची तुलना करण्यात आली होती.

कोव्हिशील्ड लशीची आधीची किंमत ‘अ‍ॅडव्हान्स्ड फंडिंग’वर आधारित होती व आता आपल्याला लशीचे उत्पादन करण्याची क्षमता वाढवण्यासाठी गुंतवणूक करायची आहे असे सांगून, या लशीची किंमत आधीच्या किमतीपेक्षा दीडपट ठेवण्याचे देशात सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या करोना प्रतिबंधक लशीचे उत्पादन करणाऱ्या सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने समर्थन केले आहे.

आपल्या पुणे येथील केंद्रात अ‍ॅस्ट्राझेनेकाच्या कोव्हिशील्ड लशीचे उत्पादन करणाऱ्या सीरम इन्स्टिट्यूटने या आठवड्याच्या सुरुवातीला लशीची किंमत प्रत्येक मात्रेसाठी ६०० रुपये आणि राज्य सरकारांसाठी, तसेच केंद्र सरकारच्या नव्या करारासाठी ४०० रुपये अशी जाहीर केली होती. सध्या ही कंपनी केंद्र सरकारला विद्यमान पुरवठ्यासाठी प्रत्येक मात्रेला १५० रुपये आकारते.

‘या लशीच्या जागतिक किमतीची भारतातील किमतीशी चुकीची तुलना करण्यात आली होती. कोव्हिशील्ड ही सध्या बाजारात उपलब्ध असलेली कोविड-१९ वरील सर्वाधिक परवडणारी लस आहे’, असे कंपनीने सांगितले. सुरुवातीची किंमत जगभरात कमी ठेवण्यात आली होती, कारण ती त्या त्या देशांनी दिलेल्या आगाऊ निधीवर आधारित होती. भारतासह सर्व सरकारांच्या लसीकरण कार्यक्रमाठी कोव्हिशील्डच्या पुरवठ्याची सुरुवातीची किंमत ही कुठल्याही लशीपेक्षा कमी राहिलेली आहे, असे स्पष्टीकरण कंपनीने दिले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Increased vaccine support from serum akp

ताज्या बातम्या