Reciprocal Tariffs On India: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लादलेल्या व्यापार करामुळे जगभरातील अनेक देश चिंतेत आहेत. या अतिरिक्त व्यापार कराचा फटका भारतालाही बसल्याचे दिसत आहे. अशात आता अमेरिकेचे व्यापार प्रतिनिधी जेमिसन ग्रीर यांनी मोठा दावा केला आहे. ते म्हणाले की, जे देश अमेरिकन वस्तूंवरील आताय कर कमी करण्याचा विचार करत आहेत, त्यामध्ये भारताचाही समावेश आहे. यावेळी जेमिसन ग्रीर यांनी असेही म्हटले आहे की, डोनाल्ड ट्रम्प यांच्या सरकारने घेतलेल्या कठोर निर्णयांमुळे आम्हाला याचे फळ मिळू लागले आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी लादलेल्या व्यापार कराचे समर्थन करताना, जेमीसन ग्रीर यांनी सिनेट फायनान्स कमिटीला सांगितले की, अमेरिका कृषी वस्तूंवर सरासरी ५ टक्के कर आकारत असला तरी, भारत याच वस्तूंवर सरासरी ३९ टक्के कर आकारत आहे.
“कृषी उत्पादनांवरील आमचा सरासरी कर ५ टक्के आहे, परंतु भारताचा सरासरी कर ३९ टक्के आहे. या व्यापार तूटीमुळे देशाचे उत्पादन, विकास आणि बांधकाम क्षेत्रावर परिणाम होत आहेत. राष्ट्राध्यक्षांना याचे गांभीर्य माहित आहे,” असे जेमिसन ग्रीर म्हणाले.
५० देशांनी साधला संपर्क
ग्रीर यांनी पुढे स्पष्ट केले की ट्रम्प यांनी व्यापार कर लादण्याचा निर्णय घेतल्यानंतर अनेक देशांनी अमेरिकन वस्तूंवरील व्यापार कर कमी करण्याची तयारी दर्शविली आहे. या देशांमध्ये भारतासह अर्जेंटिना, व्हिएतनाम आणि इस्रायलचा समावेश आहे.
“व्यापार कराबाबत चर्चा करण्यासाठी जवळजवळ ५० देशांनी माझ्याशी वैयक्तिकरित्या संपर्क साधला आहे. याचबरोबर त्यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनातील अनेक सदस्यांशी चर्चा केली आहे. अर्जेंटिना, व्हिएतनाम, भारत आणि इस्रायलसारख्या अनेक देशांनी राष्ट्रपतींच्या धोरणानुसार त्यांचे व्यापर कर आणि इतर शुल्क कमी करण्याची तयारी दर्शविली आहे,” असा दावा जेमिसन ग्रीर यांनी केला.
ग्रीर म्हणाले की, अमेरिकेच्या व्यापार तूटातील ही मोठी वाढ आणि त्याच्या उत्पादन क्षेत्राची घसरण ही योगायोगाने नाही तर एकतर्फी कर, व्यापार करण्यातील अडथळे आणि आमच्याशी व्यापार करणाऱ्या देशांनी स्वीकारलेल्या आर्थिक धोरणांमुळे आहे.
अमेरिकन कामगारांचे नुकसान
सध्याच्या परिस्थिती “राष्ट्रीय सुरक्षा आणीबाणी” असल्याचे म्हणत ग्रीर यांनी दावा केला की, या प्रकारामुळे अमेरिकन कामगारांचे खूप नुकसान झाले आहे. त्यांनी सांगितले की, १९९४ पासून अमेरिकेने उत्पादन क्षेत्रातील पाच दशलक्ष नोकऱ्या गमावल्या असून, ९०,००० कारखाने बंद पडले आहेत.