India alerted Pakistan about flood : जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध चांगलेच बिघडले आहेत. यादरम्यान दोन्ही देशातील सिंधू जल करार देखील स्थगित करण्यात आला आहे. यादरम्यान रविवारी भारताने राजनैतिक मार्गांनी तावी नदीला येणाऱ्या एका मोठ्या पुराबद्दल पाकिस्तानला सतर्क केले. इंडियन एक्सप्रेसने यासंबंधीचे वृत्त दिले आहे.

“मानवतेच्या आधारावर या मोठ्या पुरासंबंधी माहिती देण्याचा निर्णय घेण्यात आला. सिंधू जल करार (IWT) स्थगित केलेला असल्याने ही माहिती परराष्ट्र मंत्रालयामार्फत (MEA) शेअर करण्यात आली,” अशी माहिती एका सूत्राने दिल्याचे इंडियन एक्सप्रेसने म्हटले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्र सरकारच्या जल शक्ती मंत्रालयाने ही माहिती पराराष्ट्र व्यवहार मंत्रालयाला दिली, जी पुढे इस्लामाबादला पाठवण्यात आली, असे सांगण्यात आले.

सिंधू जल करार स्थगित

सिंधू जल कराराअंतर्गत पुरासंबंधीची माहिती ही इंडस वॉटर कमिशनर्स (indus water commissioners) यांच्या माध्यमातून शेअर केली जात होती. भारत आणि पाकिस्तान यांच्यात ९ वर्षे वाटाघाटी झाल्यानंतर अखेर १९ सप्टेंबर १९६० रोजी सिंधू जल करारावर सही करण्यात आली होती. या करारात १२ कलमे आणि ८ परिशिष्टे (A ते H ) आहेत .

या करारात करण्यात आलेल्या तरतुदींनुसार, सतलज, बियास आणि रावी या पूर्वेकडील नद्यांचे सर्व पाणी हे कोणत्याही बंधनाशिवाय भारताच्या वापरासाठी उपलब्ध असेल. तर सिंधू, झेलम आणि चिनाब या पश्चिमेकडील नद्यांमधून पाकिस्तानला पाणी मिळत राहील.

एप्रिल महिन्यात पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने सिंधू जल करार (IWT) स्थगित करण्याचा निर्णय घेतला. या हल्ल्यात दहशतवाद्यांनी २६ जणांना ठार केले होते. या हल्ल्यानंतर दोन्ही देशांमधील संबंध प्रचंड ताणले गेले होते.