नवी दिल्ली : विरोधकांच्या ‘इंडिया’ आघाडीतर्फे उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत संयुक्त उमेदवार दिला जाण्याची शक्यता आहे. या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीकडे (रालोआ) उमेदवार निवडून आणण्यासाठी पुरेसे संख्याबळ आहे.

निकाल काहीही असला तरी, भक्कम राजकीय संदेश देण्यासाठी निवडणुकीपासून पळ काढू नये अशी भावना विरोधकांमध्ये असल्याचे सूत्रांनी नमूद केले. या निवडणुकीत लोकसभा तसेच राज्यसभा सदस्यांना मतदानाचा हक्क असतो. त्यानुसार दोन्ही सदनातील सदस्यांची संख्या ७८२ होते.

विजयी होण्यासाठी ३९२ मतांची गरज आहे. लोकसभेत रालोआचे २९३ तर राज्यसभेत १३० सदस्यांचा त्यांना पाठिंबा आहे. संख्याबळ पाहता रालोआकडे ४२३, इंडिया आघाडीकडे ३१३ सदस्य आहेत. निवडणूक आयोगाने याची प्रक्रिया सुरू केली आहे. जगदीप धनखड यांनी मुदत संपण्यापूर्वीच राजीनामा दिल्याने उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक होत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘धनखडांसाठी निरोप समारंभ आयोजित करा’

जगदीप धनखड यांच्या अचानक राजीनाम्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या काँग्रेसने माजी उपराष्ट्रपतींसाठी निरोप समारंभ आयोजित करण्याची मागणी केली आहे. बुधवारी सायंकाळी व्यवसाय सल्लागार समितीच्या (बीएसी) बैठकीत काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी ही मागणी केली. परंतु केंद्र सरकारने यावर मौन बाळगल्याचे सूत्रांनी सांगितले.