नवी दिल्ली : बिहारमधील मतदारयाद्यांच्या विशेष सखोल फेरतपासणी (एसआयआर) मोहिमेच्या मुद्द्यावरून बुधवारी संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये काँग्रेससह ‘इंडिया’ आघाडीच्या सदस्यांनी गोंधळ घातला. लोकसभा व राज्यसभेत पीठासीन अधिकाऱ्याच्या समोरील जागेत येऊन विरोधकांनी घोषणाबाजी केल्याने सभागृहे तीनवेळा तहकूब करावी लागली. दुपारी दोननंतर कामकाज सुरू झाल्यानंतर काही वेळातच दिवसभरासाठी सभागृहे तहकूब करण्यात आली.
‘ऑपरेशन सिंदूर’प्रमाणे बिहारमधील ‘एसआयआर’ मोहिमेवरही सभागृहांमध्ये सविस्तर चर्चा झाला पाहिजे, ही मागणी विरोधक सातत्याने करत आहेत. या मागणीसाठी बुधवारी ‘इंडिया’ आघाडीच्या खासदारांनी संसदेच्या आवारात मकरद्वारासमोर निदर्शने केली. दोन्ही सभागृहांमध्ये स्थगन प्रस्ताव व नियम २६७ अंतर्गत चर्चेसाठी विरोधकांनी नोटिसा दिल्या आहेत. मात्र, केंद्र सरकार या मुद्द्यावर चर्चा करण्यास तयार नसल्याने या नोटिसा सलग तिसऱ्या दिवशीही फेटाळण्यात आल्या.
बिहारच्या मुद्द्यावरून लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केंद्रीय निवडणूक आयोगावर पुन्हा शरसंधान साधले. निवडणुकीत घोटाळ्याचा मुद्दा फक्त बिहारपुरता सीमित नाही. ‘‘काँग्रेसने महाराष्ट्रामध्ये केंद्रीय निवडणूक आयोगाने केलेला घोटाळा रंगेहात पकडला. आम्ही आयोगाकडे मतदारयाद्या मागितल्या, त्या दिल्या नाहीत. मतदानाचे चित्रिकरण दाखवा अशी मागणी केली तर, कायदाच बदलून टाकला. कर्नाटकमध्येही आम्ही मोठी चोरी पकडलेली आहे. तिथे लोकसभा निवडणुकीत घोटाळा कसा केला गेला, हे आम्ही प्रत्यक्षात दाखवू. भारतात निवडणुकीत घोटाळे हातात हे वास्तव आहे,’’ अशी टीका राहुल यांनी केली.
‘दाल में कुछ काला है’
‘ऑपरेशन सिंदूर’वर पुढील आठवड्यामध्ये होणाऱ्या चर्चेला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उत्तर द्यावे अशी मागणी विरोधकांनी केली आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’ अजून चालू आहे असे मोदी म्हणतात, त्याचवेळी विजयोत्सवाचीही घोषणा करतात. तिकडे, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प मात्र मीच मध्यस्थी केली, शस्त्रसंधी केला, असा दावा २५ वेळा केला आहे. ही विसंगती पाहता, या प्रकरणात काही तरी गडबड आहे हे नक्की, अशी टिप्पणी राहुल गांधी यांनी संसदेच्या आवारात केली.