पीटीआय, नवी दिल्ली
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी ‘इंडिया’ आघाडी संयुक्त उमेदवार देणार असून त्यासाठी काँग्रेस अध्यक्ष आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे विरोधी पक्षांशी संपर्क साधत आहेत, अशी माहिती सूत्रांनी रविवारी दिली. संभाव्य उमेदवारांच्या नावांचा विचार करणे आणि त्यावर सहमती घडवणे यासाठी खरगे विरोधी पक्षांच्या नेत्यांशी चर्चा करत असल्याचे सूत्रांनी सांगितले.
जगदीप धनखड यांनी ४ ऑगस्टला अचानक राजीनामा दिल्यामुळे उपराष्ट्रपतीपद रिक्त झाले असून निवडणूक आयोगाने ९ सप्टेंबरला होणाऱ्या निवडणुकीसाठी अधिसूचना यापूर्वीच काढली आहे. लोकसभा व राज्यसभेत सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे बहुमत आहे. मात्र, निवडणुकीचा निकाल काहीही लागला तरी त्यात भाग घेण्यापासून विरोधी पक्षांनी दूर राहू नये अशी ‘इंडिया’ आघाडीची तीव्र भावना असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. उमेदवार निवडीसाठी ठोस चर्चा झालेली नसली तरी पडद्यामागून बोलणी सुरू झाली असल्याचे सांगण्यात आले. भाजपने आपला उमेदवार जाहीर केल्यानंतरच ‘इंडिया’ने आपला उमेदवार निश्चित करावा असे आघाडीतील एका गटाचे म्हणणे आहे. उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी लोकसभा आणि राज्यसभेचे खासदार मतदान करतात. दोन्ही सभागृहांची एकत्र सदस्य संख्या ७८१ असून विजयी उमेदवाराला ३९१ मतांची आवश्यकता असेल. लोकसभा आणि राज्यसभेत मिळून रालोआचे ४२२ सदस्य आहेत.
लोकसभा निवडणुकांमध्ये गैरप्रकारांचा आरोप आणि बिहारमधील मतदारयाद्यांच्या विशेष सखोल फेरतपासणीला (एसआयआर) विरोध या मुद्द्यांवर ‘इंडिया’ आघाडीने एकजूट दाखवल्यानंतर आता ते उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीतही रालोआविरोधात लढा देण्याच्या मनस्थितीत असल्याचे दिसत आहे. लोकसभा निवडणुकीनंतर जून २०२४मध्ये खरगे यांच्या निवासस्थानी ‘इंडिया’ आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक झाली होती. त्यानंतर ते थेट गुरुवारी राहुल गांधी यांच्या घरी भोजन बैठकीला भेटले होते.
निवडणूक आयोग कार्यालयावर आज मोर्चा
लोकसभा निवडणुकीतील कथित गैरप्रकारांच्या मुद्द्यावरून ‘इंडिया’ आघाडीच्या घटक नेते आणि खासदार सोमवारी संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार आहेत. निवडणुकीतील गैरप्रकार आणि एसआयआरच्या मुद्द्यांवरून विरोधी पक्षांनी मुख्य निवडणूक आयुक्तांसह तिन्ही आयुक्तांच्या भेटीची वेळ मागितली आहे. हा मोर्चा सकाळी ११.३० वाजता सुरू होण्याची अपेक्षा आहे. यानंतर खरगे यांनी ‘इंडिया’ आघाडीच्या खासदारांसाठी सोमवारीच चाणक्यपुरी भागातील हॉटेल ताज पॅलेस येथे रात्रीचे भोजन आयोजित केले आहे.
काँग्रेसची ‘मतचोरी’विरोधात मोहीम
लोकसभा निवडणुकीत निवडणूक आयोग आणि भाजपने मतचोरी केली या राहुल गांधींनी केलेल्या आरोपांनंतर, काँग्रेसने आयोगाविरोधात आपली भूमिका अधिक आक्रमक केली आहे. या मुद्द्यावर जनमत तयार करण्यासाठी काँग्रेसने एक वेब पोर्टल सुरू केले आहे. तिथे नागरिकांना ‘मतचोरी’च्या मुद्द्यावरून निवडणूक आयोगाकडे दायित्वाची मागणी करण्यासाठी नोंदणी करता येईल, तसेच विरोधी पक्षांनी केलेल्या डिजिटल मतदारयाद्यांच्या मागणीला पाठिंबा देता येईल.
निवडणूक आयोगाकडे आमची मागणी स्पष्ट आहे – पारदर्शकता दाखवा आणि डिजिटल मतदारयादी सार्वजनिक करा, जेणेकरून जनतेला आणि राजकीय पक्षांना स्वतःच त्याचे परीक्षण करता येईल. हा लोकशाहीच्या संरक्षणासाठी लढा आहे.- राहुल गांधी, नेते, काँग्रेस