नवी दिल्ली : पूर्व लडाखमध्ये प्रत्यक्ष ताबा रेषेवरील उर्वरित संघर्षस्थळांवरून संपूर्ण सैन्यमाघारीचा उद्देश साध्य करण्यासाठी लवकरच लष्करी चर्चेची चौदावी फेरी आयोजित करण्यावर भारत व चीन यांची गुरुवारी सहमती झाली.

सीमा मुद्दय़ांबाबत ‘वर्किंग मेकॅनिझम फॉर कन्सल्टेशन अँड कोऑर्डिनेशन’ (डब्ल्यूएमसीसी)च्या आभारी बैठकीत दोन्ही बाजूंनी सध्याच्या परिस्थितीबाबत ‘स्पष्ट व सखोल’चर्चा केली आणि १० ऑक्टोबरला झालेल्या यापूर्वीच्या लष्करी चर्चेनंतरच्या घडामोडींचा आढावा घेतला, असे परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने सांगितले.

लष्करी चर्चेची पुढील फेरी आयोजित करण्यावर सहमतीशिवाय, या बैठकीचे कुठलेही मोठे फलित झाल्याची चिन्हे दिसून आली नाहीत.शांतता प्रस्थापित करण्यासाठी द्विपक्षीय करारांचे संपूर्ण पालन करून उर्वरित मुद्दय़ांवर लवकरात लवकर तोडगा करण्याच्या आवश्यकतेवर दोन्ही बाजूंची सहमती झाली.

दोन्ही बाजूंनी परिस्थिती स्थिर राखणे सुनिश्चित कावे आणि कुठलीही अप्रिय घटना टाळावी यावरही एकमत झाल्याचे परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने एका निवेदनात सांगितले.