India China Relations : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे सातत्याने भारतावर टीका करत आहेत. एवढंच नाही तर अमेरिकेने भारतावर २५ टक्के अतिरिक्त आयातशुल्क लादलं. त्याआधी भारतावर २५ टक्के आयातशुल्क लादलं होतं. त्यामुळे एकूण आयातशुल्क ५० टक्क्यांवर पोहोचल्याने भारताला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे अमेरिका-भारत संबंध ताणले गेले आहेत. असं असतानाच आता भारत-चीन संबंधांमध्ये सुधारणा होत असल्याचं पाहायला मिळत आहे.
कारण भारत सरकारने एअर इंडिया, इंडिगोला पुढील महिन्यापर्यंत चीनला जाणारी सर्व उड्डाणे पुन्हा सुरू करण्याचे निर्देश दिल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे सप्टेंबरपासून ही विमानसेवा सुरू होण्याची शक्यता आहे. या संदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे. वृत्तानुसार, भारत आणि चीन पुढील महिन्यापासून दो्ही देशांतील विमान सेवा पुन्हा होणार आहे. त्यामुळे दोन्ही देशांमधील संबंध सुधारण्याचे हे संकेत असल्याचं बोललं जात आहे.
एका अहवालानुसार, भारत सरकारने एअर इंडिया आणि इंडिगोसारख्या विमान कंपन्यांना चीनला जाणारी उड्डाणे सुरू करण्यास सांगण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. कोविड-१९ साथीपासून दोन्ही देशांमधील हवाई वाहतूक बंद करण्यात आली होती. तसेच जून २०२० मध्ये पूर्व लडाखमधील गलवान खोऱ्यात सैन्यांवर झालेल्या प्राणघातक चकमकीनंतर भारत-चीन संबंध तणावपूर्ण झाले होते.
ही घटना घडल्यानंतर दोन्ही राष्ट्रांनी प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (LAC) सैन्य तैनात केले होते. त्यामुळे भारत आणि चीनमधील संबंधांमध्ये तणाव निर्माण झाला होता. त्यानंतर लष्करी आणि राजनैतिक चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या होत्या. तसेच भारतात चिनी गुंतवणुकीवर निर्बंध, आयातीवरील कडक तपासणी आणि करोना साथीच्या काळात उड्डाणे थांबवण्यात आल्यामुळे आर्थिक आणि लोकांमधील देवाणघेवाणीवरही त्याचा परिणाम झाला होता. पण आता अलिकडच्या काही महिन्यांत हा तणाव कमी करण्यासाठी दोन्ही बाजूंनी संवाद सुरू असल्यामुळे दोन्ही देशांतील संबंध सुधारण्याची चिन्हे आहेत.
SCO परिषदेसाठी चीन करणार मोदींचं स्वागत
अमेरिका सातत्याने भारतावर टीका करत असतानाच आता भारत आणि चीनमधील संबंध सुधारण्याची होण्याची शक्यता आहे. कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन (SCO) च्या बैठकीसाठी चीनला जाणार आहेत. त्यामुळे भारत आणि चीनमधील संबंध सुधारण्याची शक्यता आहे. ३१ ऑगस्ट ते १ सप्टेंबर या काळात तियानजिन येथे या बैठकीचे आयोजन करण्यात आलेलं आहे. या बैठकीत चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन हे देखील उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे पंतप्रधान मोदी आणि शी जिनपिंग यांच्यात द्विपक्षीय बैठक होण्याची शक्यता आहे.
चीनने काय म्हटलं?
पंतप्रधान नरेंद्र मोदी एससीओ शिखर परिषदेसाठी चीनला भेट देणार असल्याच्या वृत्तांनंतर चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते गुओ जियाकुन यांनी म्हटलं की, “एससीओ तियानजिन शिखर परिषद ही एससीओच्या स्थापनेपासूनची सर्वात मोठी शिखर परिषद असेल. एससीओ तियानजिन शिखर परिषदेसाठी चीन पंतप्रधान मोदींचे चीनमध्ये स्वागत करत आहे. आम्हाला विश्वास आहे की सर्व पक्षांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे तियानजिन शिखर परिषद एकता, मैत्री आणि फलदायी मेळावा असेल आणि एससीओ विकासाच्या एका नवीन टप्प्यात प्रवेश करेल. ज्यामध्ये अधिक एकता, समन्वय, गतिमानता आणि उत्पादकता असेल.”