भारतीय लष्कराने नियंत्रण रेषा ओलांडून पाकव्याप्त काश्मीरमध्ये ‘सर्जिकल स्ट्राईक्स’ केल्याची माहिती संरक्षण मंत्रालयाकडून देण्यात आली आहे. देशाच्या सुरक्षेसाठी ही कारवाई करण्यात आल्याचे परराष्ट्र मंत्रालय आणि लष्कराच्या नवी दिल्ली येथील संयुक्त पत्रकार परिषदेत स्पष्ट करण्यात आले. दरम्यान भारताने केलेल्या या ‘सर्जिकल स्ट्राईक्स’वरुन आता अनेक क्षेत्रातील जाणकार आणि तज्ज्ञ त्यांच्या प्रतिक्रिया देत आहेत.

सध्या अनेक स्तरांतून भारतीय सैन्यदलाने केलेल्या ‘सर्जिकल स्ट्राईक्स’ला दुजोरा दिला जात आहे. विविध जाणकार आणि दिग्गजांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतलेल्या या निर्णयाची स्तुती केली आहे.
संरक्षण विश्लेषक मनमोहन सिंग यांनी ही कारवाई अतिशय विचारपूर्वक करण्यात आली आहे असे सांगितले. ‘भारताने केलेली ही एकंदर कारवाई पाहता आम्ही देखील दहशतवादी हल्ल्याच्या प्रत्युत्तरास पात्र आहोत हे सिद्ध झाले आहे’, असेही ते म्हणाले.

माजी राजदूत विवेक काटजू यांनीही भारतीय सैन्याच्या पाकिस्तानातील कारवाईवर त्यांचे मत मांडले आहे. ‘स्वत:च्या देशात चालणाऱ्या दहशतवादी कारवायांना अटोक्यात ठेवण्यास जर पाकिस्तान असमर्थ असेल आणि त्यामुळे जर शेजारी देशाला त्रास होणार असेल तर भारताने केलेली ही कारवाई योग्यच आहे’, असे म्हणत त्यांची ‘सर्जिकल स्ट्राइक्स’चे समर्थन केले आहे.

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये वायुसेनेचे माजी प्रमुख फाली मेजर यांनीही भारताच्या कारवाईचे समर्थन केले आहे. पण यासोबतच त्यांनी सतर्कतेचा इशारा दिला आहे. ‘भारताने पाकव्याप्त काश्मिरमध्ये जाऊन केलेली कारवाई पाहता सीमारेषेवर सध्या तणावाचे वातावरण पाहायला मिळत आहे. त्यामुळेच सध्या ‘एल.ओ.सी’वर तणावाचे वातावरण आहे. पाकिस्तान या हल्ल्याविषयी शांत न बसता सीमा भागात काही लहानमोठ्या शस्त्रास्त्र चकमकी घडवून आणू शकतो. त्यासाठी आपण तयार राहिले पाहिजे’, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

दरम्यान, काही दहशतवादी भारतात घुसखोरी करण्यासाठी पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळावर एकत्र आल्याची विश्वसनीय माहिती आम्हाला मिळाली होती. त्यानंतर भारतीय लष्कराने या दहशतवादी तळावर हल्ला चढवला होता. या हल्ल्यात अनेक दहशतवादी मारले गेले असून त्यांचे गंभीर नुकसान झाल्याची माहिती भारतीय लष्कराचे डीजीएमओ रणबीर सिंह यांनी दिली. भारताच्या सुरक्षेच्यादृष्टीनेच सर्जिकल स्ट्राईक्स करण्याचा निर्णय घेण्यात आला. भविष्यात अशाप्रकारची कारवाई करण्याचा आमचा कोणताही इरादा नाही. याबद्दल पाकिस्तानला माहिती देण्यात आलेली आहे, असेही यावेळी लष्कराकडून स्पष्ट करण्यात आले. नियंत्रण रेषेपल्याड करण्यात आलेल्या या धडक मोहिमेत एकही भारतीय जवान जखमी झालेला नाही. भारतीय लष्कराने ही कारवाई करण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी, उपराष्ट्रपती हमिद अंसारी आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना #SurgicalStrikes ची माहिती दिली होती.

https://twitter.com/SirJadejaaaa/status/781396915539902464