Russian Crude Oil Imported By India: भारत रशियाकडून कच्चे तेल खरेदी करत असल्यामुळे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सातत्याने भारतावर टीका करत आहेत. अशात ट्रम्प यांनी नुकताच दावा केला होता की, भारत रशियाकडून तेल खरेदी थांबवणार असल्याचे त्यांच्या कानावर आले आहे. मात्र, एएनआय या वृत्तसंस्थेला सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भारतीय तेल कंपन्यांची रशियाकडून तेल खरेदी चालूच आहे. त्यांच्या पुरवठ्याचे निर्णय किंमत, कच्च्या तेलाचा दर्जा, इन्व्हेंटरीज, लॉजिस्टिक्स आणि इतर आर्थिक घटकांवर अवलंबून असतात, असे सूत्रांनी सांगितले आहे.
भारताचे धोरणात्मक पाऊल
रशियन पुरवठादारांकडून तेल खरेदी करण्याच्या भारताच्या निर्णयाचा संदर्भ देत सूत्रांनी सांगितले की, रशिया जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा कच्चे तेल उत्पादक देश आहे. त्यांचे उत्पादन जागतिक मागणीच्या जवळजवळ १०% आहे. ते दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे तेल निर्यातदारदेखील आहेत. रशियन तेल बाजारातून बाहेर पडण्याची भीती आणि परिणामी पारंपरिक व्यापार प्रवाहाचे विघटन यामुळे मार्च २०२२ मध्ये ब्रेंट क्रूडच्या किमती प्रति बॅरल १३७ अमेरिकन डॉलर्सपर्यंत वाढल्या होत्या.
“या आव्हानात्मक परिस्थितीत, ८५% सह कच्च्या तेलाच्या आयातीवर अवलंबून असलेला जगातील तिसरा सर्वात मोठा इंधन ग्राहक म्हणून भारताने आंतरराष्ट्रीय नियमांचे पूर्णपणे पालन करून परवडणारे इंधन खरेदी करण्यासाठी धोरणात्मक पाऊल उचलले आहे”, असे सूत्रांनी सांगितल्याचे एएनआयने म्हटले आहे.
काय म्हणाले होते डोनाल्ड ट्रम्प?
“भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही, असे मला कळाले आहे. हे खरे आहे की नाही हे मला माहित नाही, परंतु हे एक चांगले पाऊल आहे.” वृत्तसंस्था एएनआयने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना डोनाल्ड ट्रम्प यांनी हा दावा केला होता. दरम्यान, रशियाकडून तेल खरेदी थांबवायची की नाही याबाबत केंद्र सरकारकडून अद्याप कोणतेही अधिकृत विधान आलेले नाही.
३१ जुलै रोजी, रॉयटर्स वृत्तसंस्थेने त्यांच्या सूत्रांचा हवाला देत वृत्त दिले होते की, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून टॅरिफ लादण्याच्या आणि किमतीतील सवलती कमी करण्याच्या धमक्यांदरम्यान, भारतीय सरकारी मालकीच्या रिफायनरीजनी गेल्या आठवड्यात रशियन तेल खरेदी थांबवली आहे.
रशियन तेलावर थेट निर्बंध नाहीत
रशियन तेल खरेदीबाबत भारताने घेतलेल्या निर्णयाच्या अधिक ऐतिहासिक पार्श्वभूमीची माहिती देताना सूत्रांनी सांगितले की, “रशियन तेलावर कधीही थेट निर्बंध घालण्यात आलेले नाहीत. जी७ आणि युरोपियन युनियनने त्यावर किंमतमर्यादा यंत्रणा लागू केली होती, ज्याचा उद्देश रशियाचे उत्पन्न मर्यादित ठेवणे आणि जागतिक पुरवठा सुरळीत चालू राहणे असा होता.”