Rajnath Singh On Asim Munir : पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तानला चांगलाच धडा शिकवला. मात्र, तरी देखील पाकिस्तानच्या काही नेत्यांकडून भारताविरोधात गरळ ओकणं सुरूच असल्याचं मागच्या काही दिवसांत पाहायला मिळालं. काही दिवसांपूर्वी पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांनी भारताला अणुयुद्धाची धमकी देण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, याचवेळी असीम मुनीर यांनी केलेल्या एका विधानाची मोठी चर्चा रंगली होती.
असीम मुनीर यांनी भारताबाबत बोलताना भारताची तुलना चमकदार मर्सिडीज कारशी केली होती, तर पाकिस्तानची तुलना ‘डंप ट्रक’ अशी केली होती. त्यांच्या या विधानानंतर असीम मुनीर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल झाले होते. दरम्यान, असीम मुनीर यांच्या या विधानानंतर आता भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी प्रतिक्रिया देत असीम मुनीर यांच्या विधानाची खिल्ली उडवली आहे.
राजनाथ सिंह यांनी म्हटलं की, ‘पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांनी भारत आणि पाकिस्तानच्या आर्थिक परिस्थितीची तुलना करताना अलीकडेच एक विधान केलं होतं. असीम मुनीर यांचं विधान हे पाकिस्तानच्या अपयशाची कबुली देण्यासारखं आहे’, असं राजनाथ सिंह यांनी म्हटलं. या संदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे.
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह काय म्हणाले?
“जर एकाच वेळी दोन देशांना स्वातंत्र्य मिळालं आणि एका देशाने कठोर परिश्रम, सुदृढ धोरणे आणि दूरदृष्टीने फेरारीसारखी अर्थव्यवस्था उभारली, तर दुसरा देश अजूनही डंपरच्या स्थितीत असेल तर ते त्यांचं स्वतःच अपयश आहे, असं काही जण म्हणत होते. खरं तरअसीम मुनीर यांचं हे विधान मी कबुलीजबाब म्हणूनही पाहतो”, असं राजनाथ सिंह यांनी एका कार्यक्रमात बोलताना म्हटलं आहे.
असीम मुनीर यांनी काय विधान केलं होतं?
असीम मुनीर यांनी भारताबाबत बोलताना भारताची तुलना चमकदार मर्सिडीज कारशी केली होती. तसेच पाकिस्तानची तुलना ‘डंप ट्रक’ अशी केली होती. तसेच या दोन्ही वाहनांची धडक झाली तर कोणाचं नुकसान होईल? असा सवाल असीम मुनीर यांनी केला होता. मात्र, स्वत:च्या देशाची तुलना ‘डंप ट्रक’ अशी केल्याने आणि भारताची तुलना चमकदार मर्सिडीज अशी केल्यामुळे असीम मुनीर हे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल झाले होते.