India On Dalai Lama Successor: दलाई लामा यांनी दोन दिवसांपूर्वी स्पष्ट केले होते की, केवळ त्यांनी स्थापन केलेली संस्थाच त्यांच्या उत्तराधिकारीला मान्यता देऊ शकते. यानंतर चीनमधून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या होत्या. अशात भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने शुक्रवारी यावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. परराष्ट्र मंत्रालयाने असे म्हटले आहे की, “भारत सरकार धार्मिक प्रथांशी संबंधित बाबींवर कोणतीही भूमिका घेत नाही.”
तिबेटी बौद्ध धर्माचे ८९ वर्षीय आध्यात्मिक नेते दलाई लामा यांनी त्यांच्या मृत्यूनंतरही दलाई लामांची संस्था सुरू राहील, अशी घोषणा केल्यानंतर आणि त्यांचा उत्तराधिकारी निवडण्याची प्रक्रिया स्पष्ट केल्यानंतर दोन दिवसांनी परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी यावर भाष्य केले आहे.
दलाई लामांच्या या घोषणेनंतर चीनमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटल्या होत्या. चीनने म्हटले होते की, दलाई लामांच्या उत्तराधिकाऱ्याची निवड चीन सरकारच्या मंजुरीनंतरच केली पाहिजे.
दलाई लामांच्या विधानाबाबत माध्यमांच्या प्रश्नांना उत्तर देताना जयस्वाल यांनी म्हटले की, “भारत सरकार श्रद्धा आणि धर्माच्या प्रथांबाबत कोणतीही भूमिका घेत नाही किंवा त्यावर भाष्य करत नाही.”
“सरकारने नेहमीच भारतातील धार्मिक स्वातंत्र्याचे समर्थन केले आहे आणि ते कायम करत राहील,” असे ते पुढे म्हणाले.
जयस्वाल यांचे वक्तव्य हे या प्रकरणाकडे केंद्र सरकारच्या संतुलित दृष्टिकोनाचे संकेत देते. कारण गेल्या काही दिवसांपासून केंद्र सरकार चीनशी संबंध सामान्य करण्याचे प्रयत्न करत आहे. अशा परिस्थितीत या प्रकरणाच्या संवेदनशीलता लक्षात घेत केंद्र सरकारने दलाई लामांचा उत्तराधिकारी निवडण्याचा मुद्दा तिबेटी बौद्धांच्या हाती सोपवला असल्याचे या प्रकरणाशी परिचित असलेल्यांनी सांगितले. याबाबत हिंदुस्तान टाईम्सने वृत्त दिले आहे.
गुरुवारी, केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी असे विधान केले होते की, दलाई लामांचा उत्तराधिकारी निवडण्याचा अधिकार विद्यमान दलाई लामा आणि त्यांच्या संस्थेचा आहे. बौद्ध धर्माचे पालन करणारे रिजिजू यांचे वक्तव्य सरकारच्या मत मानले जात होते.
६ जुलै रोजी दलाई लामा यांच्या ९० व्या वाढदिवसानिमित्त धर्मशाळा येथे होणाऱ्या समारंभाला केंद्रीय मंत्री राजीव रंजन सिंह आणि अरुणाचल प्रदेश तसेच सिक्कीमच्या मुख्यमंत्र्यांसह किरेन रिजिजूही उपस्थित राहणार आहेत. रिजिजू म्हणाले की, दलाई लामांची संस्था तिबेट आणि जगभरातील तिबेटींसाठी सर्वात महत्त्वाची संस्था आहे.