S. Jaishankar On America Pakistan Relations : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर ५० टक्के आयात शुल्क लादल्यानंतर पाकिस्तानशी जवळीक साधताना दिसून आले. डोनाल्ड ट्रम्प सातत्याने भारतावर टीका करत आहेत. मात्र, असं असताना अमेरिका आणि पाकिस्तानमधील मैत्री वाढल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. याचं कारण म्हणजे पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांनी गेल्या दोन महिन्यांत दोन वेळा अमेरिकेचा दौरा केला. त्यामुळे दोन्ही देशांमधील संबंध वाढल्याचं बोललं जात आहे.
दरम्यान, अमेरिकेची पाकिस्तानशी मैत्री वाढतेय का? यावर भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी शनिवारी एका कार्यक्रमात बोलताना प्रतिक्रिया देत पाकिस्तान आणि अमेरिका यांच्यातील संबंधांवर टीका केली आहे. ‘दोन्ही देशांचा इतिहास दुर्लक्षित करण्याचा इतिहास आहे’, असं एस जयशंकर यांनी म्हटलं आहे. या संदर्भातील वृत्त हिंदुस्तान टाईम्सने दिलं आहे.
मंत्री एस जयशंकर काय म्हणाले?
पाकिस्तानच्या अबोटाबादमधून ओसामा बिन लादेनला पकडल्याची जयशंकर यांनी यावेळी आठवण करून दिली आणि पाकिस्तान आणि अमेरिका यांच्यातील संबंधांवर टीका केली. एस जयशंकर म्हणाले की, “त्यांचा (अमेरिका आणि पाकिस्तान) एकमेकांशी एक इतिहास आहे आणि त्यांचा इतिहास दुर्लक्षित करण्याचा इतिहास आहे. तेच सैन्य आहे जे अबोटाबादमध्ये (पाकिस्तानमध्ये) गेले आणि तिथे कोण होतं हे शोधलं होतं?”, असं मंत्री एस जयशंकर यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, एस जयशंकर यांनी यावेळी असंही अधोरेखित केलं की भारत-पाकिस्तानच्या प्रश्नांमध्ये कोणत्याही तिसऱ्या पक्षाची मध्यस्थी भारत स्वीकारत नाही. १९७० च्या दशकापासून म्हणजे ५० वर्षांहून अधिक काळापासून भारत-पाक संघर्षात मध्यस्थी करण्याच्या मुद्द्यावर या देशात एक राष्ट्रीय एकमत आहे की, आम्हाला पाकिस्तानबरोबरच्या संबंधांमध्ये कोणतीही मध्यस्थी स्वीकारायची नाही”, असं जयशंकर म्हणाले.
#WATCH | Delhi: "They have a history with each other, and they have a history of overlooking their history… It is the same military that went into Abbottabad (in Pakistan) and found who there?…" says EAM Dr S Jaishankar on relations between US and Pakistan, at The Economic… pic.twitter.com/wpYGfdLpbc
— ANI (@ANI) August 23, 2025
रशियन तेल खरेदीवर टीका करणाऱ्यांना भारताने फटकारले
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी शनिवारी रशियासोबतच्या भारताच्या ऊर्जा व्यापाराचे समर्थन केले आणि म्हटले की, भारताची रशियाकडून सुरू असलेली तेल खरेदी राष्ट्रीय आणि जागतिक हितासाठी आहे. इकॉनॉमिक टाईम्स वर्ल्ड लीडर्स फोरममध्ये बोलताना त्यांनी अधोरेखित केले की, अमेरिकेसोबतच्या चर्चेत व्यापार हा ‘अडथळा मुद्दा’ राहिला असला तरी भारत आपले निर्णय स्वतंत्रपणे घेत राहील.
यावेळी भारतावर रशियन तेल खरेदी करतो म्हणून टीका करणाऱ्यांना उत्तर देताना जयशंकर म्हणाले की, “अमेरिकेतील व्यवसायपूरक प्रशासनासाठी काम करणारे काही लोक इतरांवर नफ्यासाठी व्यापार करत असल्याचा आरोप करत आहेत, हे गंमतीशीर आहे. जर तुम्हाला भारताकडून तेल किंवा तेलप्रक्रिया केलेली उत्पादने खरेदी करण्यात अडचण असेल, तर खरेदी करू नका. यासाठी तुम्हाला कोणीही जबरदस्ती केली नाही. तुम्हाला नको असेल, तर खरेदी करू नका.”